Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

गडावर एक लाखांवर भाविक निघाले पायीच...!
सकाळ वृत्तसेवा
Friday, March 26, 2010 AT 12:45 AM (IST)
धुळे - श्री सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी जिल्ह्यातून एक लाखांवर नागरिक पायीच निघाले आहेत. यामुळे मुंबई- आग्रा महामार्ग एकेरी सुरू आहे. या भाविकांना पाणी, सरबत, भोजन देण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील 50 हून अधिक दानशूर सामाजिक, राजकीय संघटना, मंडळे, संस्थांनी पुढाकार घेतला असून मानवतेची वेगळी परंपरा त्यांनी यंदाही जोपासली आहे. हजारो तरुणांनी या सेवाभावासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील शेतीसह विविध आस्थापनातील मजूर, कारागीर गडावर निघाल्याने बहुसंख्य व्यवहार आठवड्यासाठी ठप्प असतील. सामान्य व श्रीमंत कुटुंबे देखील या यात्रेत सहभागी झाले आहेत.

कळवण (जि. नाशिक) येथून 19, तर नांदोरीहून 10 किलोमीटरवर श्री सप्तशृंगीदेवीचा गड आहे. श्री सप्तशृंगी मातेची यात्रा बुधवारपासून (ता. 24) सुरू झाली आहे. ती पंधरा दिवस चालते. चैत्रौत्सवातील या यात्रेसाठी लाखोंवर भाविक खानदेशातून जात असतात. जिल्ह्यातून बुधवारपासून हजारो नागरिक यात्रेनिमित्त श्री सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी निघाले आहेत. दोन दिवसांत ही संख्या एक लाख नागरिकांवर झाली.

मदतीसाठी सरसावले
अक्षरशः आबालवृद्ध पायीच गडाकडे निघाले आहेत. त्यात अपंग भाविकांचाही सहभाग आहे. महिला, तरुणींची संख्या लक्षणीय आहे. यामुळे शिरपूरपासून मालेगावपर्यंतचे रस्ते, महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू झाली आहेत. या पायी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी रस्ते, महामार्गांवर शेकडो सामाजिक संघटना, संस्था, राजकीय पक्षांनी स्टॉल टाकले आहेत. ते प्रवाशांना पाणी, सरबत, भोजन मोफत देत आहेत. लाखो नागरिकांना दिवसरात्र अन्नदान व पाणी देण्यासाठी हजारो तरुण, कार्यकर्ते, दानशूरांनी पुढाकार घेतला आहे. रस्त्यांवर टप्प्याटप्प्याने हे स्टॉल असल्याने नागरिकांचा प्रवास सुकर होत आहे. महात्मा फुले समता परिषदेच्या महानगर शाखेने, मनपाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थायी सभापती सतीश महाले यांच्या पुढाकाराने भाविकांना 30 मार्चपर्यंत अखंड उसाचा रस दिला जात आहे. मोहाडी उपनगरातील शिंदे परिवारातर्फे 24 तास महाप्रसादाची व्यवस्था नगरसेवक विनायक शिंदे, पहिलवान राजू शिंदे यांनी केली आहे. अशा शेकडो संस्था, संघटनांनी याकामी पुढाकार घेतला आहे. शिवसेनेच्या जिल्हा शाखेतर्फे मोफत भोजन व वैद्यकीय सेवा दिली जात आहे.

धुळ्याहून सर्वाधिक
शिरपूरहून यंदा हजारोंच्या संख्येने नागरिक गडावर निघाले आहेत. त्यापाठोपाठ धुळे, साक्री, शिंदखेडा तालुक्‍यातूनही ओघ आहे. बहुसंख्य शेती व विविध आस्थापनातील मजूर, कामगार, कारागीर पायीच गडाकडे निघाले आहेत. सामान्य व श्रीमंत कुटुंबेदेखील सहभागी झाले आहेत. प्रामुख्याने कष्टकरी वर्ग दर्शनासाठी निघाल्याने अनेक व्यवहार आठवडाभरासाठी ठप्प असतील, असे संबंधितांनी सांगितले.

गडावर 29 मार्चला मध्यरात्री भगवती शिखरावर मानाचा कीर्ती ध्वज फडकवला जाईल. यानिमित्ताने मिरवणूक काढली जाते. त्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. भाविकांच्या ओघात सर्वाधिक धुळे, शिरपूर, जळगाव मग त्यातील इतर गावे, तालुक्‍यांचा समावेश आहे.

काळजी नेमकी काय घ्यावी?
गडावर पायी जाताना नागरिकांनी उन्हाबाबत काळजी घ्यावी. उन्हातून सावलीत बसल्यावरच पाच मिनिटांनी पाणी घ्यावे किंवा उन्हात असले तरी थांबून पाच मिनिटांनी पाणी घ्यावे. छत्रीचा वापर करावा. लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. पुरेशी विश्रांतीदेखील घ्यावी. रस्त्यावरून जाताना शिस्तीत, इतरांना, वाहनांना अडचण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. तरुणांनी रस्त्यावर नाचत जाऊ नये. ढकलाढकली करू नये. वाहनापासून कमाल अंतरावर राहावे. प्रकृतीच्यादृष्टीने योग्य ती काळजी घेऊन प्रसंगी गरज भासल्यास वैद्यकीय सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी केले आहे.
प्रतिक्रिया
On 3/26/2010 11:25 AM Bachhav Bahila said:
श्री सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांचे हर्दिक स्वागत
On 3/26/2010 11:18 AM Bhahwan Bhimrao Nerkar said:
गडावर पायी येतांना भाविकांनी स्वाइन फ्लूचा प्रसार होणार नाही याची काळजी घ्यावी त्यासाठी मास्क चा वापर करावा . भाविकांनी रस्त्याने येतांना डाव्या बाजूनेच चालावे . गडावर पायी येणा-या भाविकांचे श्री सप्तशृंग निवासिनी देवी संस्थान तर्फे हार्दिक अभिनंदन आपला प्रवास सुखाचा होवो . तसेच भाविकांनी मंदिरात जातांना आपले दागदागिने लहान मुले सांभाळावे व चोरान पासून सावध रहावे , तसेच मंदिराचे पावित्र्य राखावे. मंदिरात जातांना ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे.
On 3/26/2010 8:04 AM Ravi Padvi, Shirpur said:
गडावर पायी जाताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. प्रवासास सकाळी सुरुवात करून ११.३० ते १२.०० पर्यंत प्रवास करावा व दुपारी ३.३० नंतरच प्रवास करावा. महामार्गावरून येता-जाताना लहानथोर सर्वच भाविक ऐन उन्हाच्या वेळी पायी चालताना दिसतात. त्याचा परिणाम prakrutivar होतो मात्र त्याची तमा न बाळगता प्र्वास्सुरुच ठेवतात.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: