कऱ्हा ते मिसिसीपी, जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात येताना अनेक गंमती बघायला मिळतात, तिथे रस्त्यावर डाव्याबाजूने गाडी चालवतात, इथे उजव्या बाजूने, तिथे पाणी तर इथे कागद, तिथली मुलं 'ये रे ये रे पावसा' म्हणतात तर इथे 'रेन रेन गो अवे, कम ऑन अनदर डे' असं बडबडतात, या आणि अशा अनेक 'सांस्कृतिक धक्क्यांमधे', मला सर्वात जास्त जाणवलेला 'कल्चरल शॉक' म्हणजे इथलं स्त्री-पुरूष सहजीवन, कुटूंबव्यवस्था आणि नातिगोती !
बॉयफ्रेन्ड, गर्लफ्रेन्ड ते 'लिव्ह इन्'सर्वसाधारण शाळेत किंवा युनिवर्सिटिमधे असताना ज्यावयात 'कुणाकडे' तरी चोरून बघण्याचा अनावर मोह होतो, त्याच वयात इथे सहजीवनास सुरूवात होते, सभोवतालच्या वातावरणातून मुलं आपापला जोडिदार निवडतात , 'तो' तिचा बॉयफ्रेन्ड आणि 'ती' त्याची गर्लफ्रेन्ड. टिनएजमधे सुरू झालेलं आयुष्य गंमतदार असलं तरी दोघांना कॉलेज, इंटर्नशिप, अर्धवेळ नोकरी आदी गोष्टी कराव्या लागतात आणि स्वतंत्र रहात असल्यास पैसेही कमवावे लागतात, काहिना मुलही होतात, अनेक वर्ष या पद्धतीने राहिल्यानंतर, आपलं पटतय, आता आपले संबंध पुढच्या पायरीवर न्यावेत असं वाटल्यास वेळ येते ती 'एन्गेजमेंटची', यानंतर याच्यातलं नात बदलतं, तो 'फियान्स' आणी ती 'फियान्सी' यानंतर काही काळाने लग्न, यानंतरची त्यांची रिलेशन म्हणजे कायदेशीर पति-पत्नी, आणि यापूर्वी होतं ते सगळं - लिव्ह इन रिलेशनशिप ! काय गंमत आहे ना अमेरिकेतल्या तरूणाईची ! ज्या वयात कऱ्हेकाठी पालक सातच्या आत घरात असं सांगतात, आम्हाला अभ्यासाच्या घाण्याला जुंपतात आणि आल्या गेल्या फोनवर कान टवकारतात, त्यावयात यांची आयुष्य सुरू होतात, ना सेटल व्हायची घाई, ना स्थळं बघायची चिंता, ना पत्रिका जुळवायची खटपट, ना हुंड्यासाठी मारपिट शिवाय हे सगळं न घाबरता, दबावाशिवाय.
एका पिढीकडून दुसऱया पिढीकडेपण या जगण्याला दुसऱ्या बाजूही आहेत. लिव्ह-इन मधे कोणाबरोबरही रहायच जसं स्वातंत्र्य आहे, तसंच सोडायचं देखील. आवडणाऱ्या गुणांमुळे एकत्र रहाणारे, न आवडत्या गुणांमुळे 'ब्रेक-अप' होतात. कधी जोडिदार बाहेरख्याली म्हणून, कधी गरिब म्हणून, तर कधी जाड म्हणून, कधी व्यसनी म्हणून तर कधी घोरणारा म्हणून .. कोण कुणाला कधी सोडून जाईल हे सांगता येत नाही, ब्रेक-अप झाल्यावर परत शोधाशोध-डेटींग, लिव्ह-इन, विभक्ती, हे चक्र अव्याहतपणे सुरूच रहातं.. जो पर्यंत मनासारखा जोडिदार मिळत नाही तोपर्यंत. या सगळ्याचा परिणाम म्हणजे विस्कटलेली आयुष्य, अगदी सहज कुठेही दिसणाऱ्या छोट्या कुमारी माता, सिंगल पॅरेन्टस, पार्टनर नसल्याने हताश झालेले मनोरुग्न, व्यसनाधीनता, कायम 'कुणाचातरी' शोध घेणाऱ्या नजरा आणि शेकडोने असणाऱ्या डेटींग वेबसाईटस. प्रश्नांची ही व्यापकता आणखी वाढत जाते, जेव्हा सिंगल पॅरेन्ट्स परत डेटींग सुरू करतात, दोघांचीही मुलं असतील तर वेगळाच प्रकार, आणि कहर म्हणजे ती मुलं टिन-एज असतील तर. सोळा सतराव्या वर्षी झालेलं मुलं सिंगल पॅरेन्ट्स तिशीत असताना वयात येतात. डेटींग करणाऱ्या 'त्यांचं' जसं 'दुसऱ्या'च्या मुलांशी रक्ताचं नातं नसतं तसाच जिव्हाळाही नसतो, यातून निर्माण होणारे बाल-लैंगिक शोषण प्रश्न, हे समाजाला वेगळ्या वळणावर आणून सोडतात, हे सगळं पहात असताना मला सर्वात जास्त गंमत वाटते ती नातेसंबंधाची, लिव्ह-इन माणसांच्या जगण्याला इतक लवचिक बनवंत की यांच्या बोलण्यात पालकांबद्दल बोलतानासुद्धा - आईचा बॉयफ्रेन्ड, डॅडी लग्न करतायत, हाल्फ ब्रदर, हाल्फ सिस्टर, स्टेप मॉम हे शब्द येतात, आणि 'त्याच्या' आईचा बॉयफ्रेन्ड हा डॅडचा उल्लेख नसून कोणी वेगळा आहे हे समजल्यावर एक भारतीय मन सुन्न झाल्याशिवाय रहात नाही. जोडीदार बदलणारे पालक आणि स्वत:चं उमलतं आयुष्य हे या मुलांना स्वतंत्र रहायला हाक देतं आणि परत एक नविन पिढी आपलं जगणं सुरू करते, जन्मदात्री आई एकिकडे, वडिल एकिकडे भावंड दुसरिकडे ... आठवणीने भेटणं होतं मदर्स, फादर्स डेला. अर्थात सगळे असेच असं नाही, मी रहातो त्या मिड-वेस्टमधे कुटूंबवत्सलता अधिक आहे.
काही वेगळेपण आहे...एकिकडे हे प्रश्न असले तरी दुसरीकडे शिकण्यासारखंही बरचं आहे, प्रेम डोळ्यांना दाखवता येत नाही, पण ते कृतीतून व्यक्त होऊ शकतं, हे वाक्य इथे जगतात. जोडिदार सोडून जाऊ नये, तो दुखावू नये यासाठी आयुष्य फुलवणारी माणसंदेखिल भेटतात. एकमेकांशी भेटल्यावर आनंद व्यक्त करणं आणि एकमेकांना प्रेमाने संबोधनं, यामधून भावना व्यक्त करणं, जोडिदाराची काळजी घेणं आणि कुटूंबाला, जोपर्यंत बरोबर आहेत तोपर्यंत मुलांना वेळ देऊन 'भन्नाट जगणं' हे वेगळेपण इथे आहे, तिकडे नाही.
स्वातंत्र्य हवं प्रत्येकालाचभारतीय विवाह संस्था, एकत्र कुटूंब आणि नाती याचं आपण बऱ्याच वेळा कौतुक करतो. लग्न आयुष्यभर टिकतात, नडि-आडिला माणस असतात. एक भारतीय म्हणून मला याचा निश्चित अभिमान आहे पण ती लग्न टिकवणाऱ्या अनेकांना काय यातना सोसाव्या लागतात हाही एक प्रश्न आहे, आत्महत्या करणारी प्रेमी युगलं, नवऱ्याचा गुरासारखा मार खाणाऱ्या, हुड्यांसाठी जळालेल्या मुली, मुलीच्या लग्नासाठी चपला झिजवणारा बाप, आणि एकमेकांच्या अहंकाराची बळी झालेली सासर-माहेरची माणंस, खोटे-मान-पान हेही याच संस्थेची बाय-प्रॉडक्टस नाहीत का ? या सर्वातून सुटून मुक्तपणे एक आनंदी आयुष्य जगण्याचं स्वातंत्र प्रत्येकालाच हव आहे होय ना ?
दुसरा विचार नाहीच का करता येणार?या आचार आणि विचारस्वातंत्र्याला नैतिकतेची जोड आवशक आहे, नाहीतर स्वातंत्र्याचा हा प्रवाह चुकीच्या दिशेनेही जाऊ शकतो ज्यातून समलिंगी संबंध, बाल-शोषण अशा विकृती उभ्या ठकतील, व पश्चिमेकडिल प्रश्न आपल्या दारात येऊन उभे रहातील, या व्यक्तीस्वातंत्र्यातून स्वैराचाराची भिती वाटणं साहजिक आहे, पण तसं होणार नाही, आम्ही कॉम्प्युटर वापरतो पण ज्ञानोबा विसरलो नाही, आम्ही पबला नाचायला जाऊ पण सकाळची पूजा आहेच ना ? मॅक्डी आलं तरी पिठलं-भाकरी आहेच ना ? कोक आलं म्हणून ताक गेलं का ? मुक्तछंद जगणारी समाजव्यवस्था कदाचित जातिव्यवस्थेचा प्रश्न निकालात काढेल, हे हुंडाबळीला आव्हान असेल, स्त्रीस्वातंत्र्यासाठी वेगळी चळवळ करावी लागणारं नाही, कदाचित मध्यमवर्गीय पालकांवरील आर्थिक ताण कमी होईल, घरा-दाराच्या नावाशिवाय स्वत: जोडिदार शोधायचा म्हणजे मुलांना थोडसं जवाबदार बनवेल, कदाचित पाश्चिमात्य लिव्ह-इन आणि भारतीय विवाहसंस्था यांचा सुवर्णमध्य असलेली नविन सहजीवनपद्धती उभी राहिल, दुसरीकडे असा विचार करायला काय हरकत आहे ?
आई-बाबांचा लग्नसोहळा...कॅमेऱ्यातून टिपलेला क्षितीजावरचा केशरी संधिप्रकाश पहायला नेहमीच आनंद वाटतो पण 'त्यानंतर पुढे काय झालं' हे सांगणं जसं कठीण तसाच हाही प्रश्न आहे, तो प्रकाश पूर्वेकडून आलेला असेल तर दिवस उजाडतो आणि पश्चिमेकडून आलेला असेल तर काळॊखी रात्र .. अधिक बोलणे न लगे .. एक मात्र गंमत आहे .. माझ्या पिढीला जे जमलं नाही ते पुढच्या पिढीला जमेल ... आपल्या आई बाबांचा लग्न सोहळा पहाण्याचं !
लेखकाचा ई मेल: s4somesh@gmail.com