एकही गोष्टी जुळूनच येत नाही - धोनी
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, March 30, 2010 AT 12:00 AM (IST)
अहमदाबाद - चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि त्याच्या संघासाठी आयपीएल-3 मधील स्थिती फार बिकट झाली आहे. रविवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध ते पराभूत झाले. चेन्नईचा हा सलग चौथा आणि एकूण पाचवा पराभव आहे. ""आमची एकही गोष्ट जुळूनच येत नाही,'' असे हताश उद्गार धोनीने काढले.
मालिका अथवा स्पर्धेत संघाचे स्वरूप लवकर स्थिरावल्यास धोनी निश्चिंत असतो आणि ते बदलण्यास त्याची तयारी नसते. या संदर्भात कबुली देताना तो म्हणाला, ""आम्ही संघात अनेक बदल केले, पण एकही गोष्ट जुळून आलेली नाही. आम्हाला अधिकाधिक बदल करणे भाग पडले आहे. आमचे एक तरी "कॉंबिनेशन' जमून येण्याची गरज आहे. यानंतर पुढील प्रत्येक सामना महत्त्वाचा असेल.''
धोनीला गोलंदाजीच्या स्वरूपामध्येही बदल करणे भाग पडले आहे. कोणता गोलंदाज एक खराब षटक टाकून संघाचे नुकसान करेल, याची कल्पना येणे त्याच्यासाठी अशक्य झाले आहे. त्यातच संघाचे बलस्थान असलेली फलंदाजीही सातत्य दाखवू शकलेली नाही. चेन्नईचे निम्मे सामने झाले आहेत. त्यांच्या खात्यात केवळ दोन विजय जमा आहेत. गुणतक्त्यात हा संघ सातव्या म्हणजे शेवटून दुसऱ्या स्थानावर आहे. केवळ किंग्ज इलेव्हन पंजाब त्यांच्याखाली आहे. उरलेल्या सात सामन्यांत चेन्नईला पाच लढती घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळेल. एक सामना नागपूरला, तर धर्मशालामध्ये होईल.
चेन्नईने 2008 मध्ये अंतिम, तर 2009 मध्ये उपांत्य फेरी गाठली होती. या वेळी मात्र त्यांच्यासाठी विजेतेपद, उपविजेतेपद नव्हे तर साधी उपांत्य फेरी गाठणेसुद्धा खडतर झाले आहे. इतकी चांगली गुणवत्ता असलेला संघ मैदानावर का कामगिरी करून दाखवू शकत नाही, हे कोडे धोनीला सुद्धा पडले असून तो सुद्धा गोंधळून गेला आहे. ""आमच्या पराभवाचे एकच असे कारण देता येणार नाही, कारण आमची फलंदाजी आणि गोलंदाजी सुद्धा यशस्वी ठरलेली नाही,'' असे तो म्हणाला. कोलकता आणि दिल्लीविरुद्धच्या लढती सोडल्यास धोनीचे म्हणणे योग्य ठरते. इतर सामन्यांत त्यांचे कोणतेही प्रयत्न यशस्वी ठरू शकले नाहीत. चेन्नईचा खेळ कधी चमकदार, तर कधी रटाळ झाला आहे, पण त्यांची भट्टी जमून आलेली नाही.
हसी, बोलिंजरची प्रतीक्षा
या पार्श्वभूमीवर चेन्नईला माईक हसी आणि डग बोलिंजर या दोन खेळाडूंची प्रतीक्षा लागून राहिली आहे. धोनीने खिन्नपणेच तसे सांगितले. ऑस्ट्रेलियाचा बोलिंजर सध्या न्यूझीलंड दौऱ्यातील कसोटी मालिकेत सहभागी झाला आहे आणि तो चांगल्याच फॉर्मात आहे. या आठवड्याच्या अंतिम टप्प्यातच ते उपलब्ध होणार आहेत. बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरशी चेन्नईची लढत आहे. त्यानंतरच हे दोघे दाखल होतील. पण आणखी एक पराभव पत्करावा लागल्यास चेन्नईच्या मोहिमेला मोठा हादरा बसेल. तसे झाल्यास त्यांना संघाच्या पुनर्बांधणीला सुरवात करून पुढील मोसमाची तयारी करणेच सोईचे ठरेल.
राजस्थानसारखी स्थिती?
खरे तर 2008 मध्ये विजेतेपद मिळविण्यापूर्वी शेन वॉर्नच्या राजस्थान रॉयल्स संघाची स्थिती अशीच झाली होती. त्यांची सुरवातही धक्कादायक झाली होती, पण नंतर वॉर्नच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली हा संघ बहरला आणि राजस्थानने थेट विजेतेपदालाच गवसणी घातली. आता धोनीला सुद्धा अशीच कामगिरी करून दाखवावी लागेल. त्यासाठी कर्णधार म्हणून त्याला नावीन्यपूर्ण कल्पना आणि डावपेच लढवावे लागतील. तसे करण्याची क्षमता आपल्याकडे असल्याचे त्याला सिद्ध करून दाखवावे लागेल.