Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

गडचिरोली, चंद्रपुरात पाऊस
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, March 30, 2010 AT 12:15 AM (IST)

चंद्रपूर/गडचिरोली - पूर्व विदर्भातील काही भागात आज (ता. 29) अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून; चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे वीज कोसळून एक युवती ठार झाली. गडचिरोली शहरात झालेल्या वादळी पावसाने झाडे कोसळून वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना अंधाराशी सामना करावा लागला.

चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, सावली आणि ब्रह्मपुरी तालुक्‍यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी मेघगर्जनेसह; तर काही भागांत पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या. ब्रह्मपुरी तालुक्‍यातील चिचगाव येथील रीना गणपत अलोने (18) ही युवती वीज पडून ठार झाली. तिने बारावीची परीक्षा यावर्षी दिलेली होती. गावाजवळील नदीवर कपडे धुण्यासाठी ती गेली असता, परत येताना विजांच्या कडकटासह जोरदार पावसाला सुरवात झाली. यातच रीनाच्या अंगावर वीज कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी साडेचारच्या सुमाराला घडली. राजुरा येथे वादळवाऱ्यासह आलेल्या पावसात वृक्षे उन्मळून पडली. येथील स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद समोर असलेले नीलगिरीचे झाड विद्युततारेवर पडले. त्यामुळे बराच वेळ गावातील वीज बंद होती. चुनाळा येथील रमेश निमकर यांच्या घरावरील छत उडाल्याने घरातील धान्याचे नुकसान झाले. आठवड्यात वीज पडून ठार झालेल्यांची संख्या आता तीनवर गेली आहे.

गडचिरोली - शहरात आज (ता.29) सायंकाळी अचानक वादळवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वादळामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी विजेचे खांब व झाडे पडल्यामुळे रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित होता. पावसामुळे रब्बी पीक तसेच चहाटपऱ्या व कवेलूच्या घरांचे मोठे नुकसान झाले. आरमोरी मार्गावरील बाबा फरीद दर्ग्याजवळ तसेच महामार्गावर ठिकठिकाणी विजेचे खांब व झाडे पडल्यामुळे काही तास वाहतूक बंद होती. शहराबाहेर काही अंतरावर बोराएवढ्या गाराही पडल्या असून वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते. रस्त्यावर विजेचे तार लोंबकळत असल्याने वाहतुकीसाठी मोठी अडचण निर्माण होऊन नागरिकांनीच पडलेल्या झाडांची विल्हेवाट लावली. वादळी पावसामुळे रब्बी पिकासोबतच आंब्याचेही मोठे नुकसान झाले आहे.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: