मनसेतून शिवसेनेत आलेल्यांना पदांची बक्षिसी
सकाळ वृत्तसेवा
Saturday, April 03, 2010 AT 12:30 AM (IST)
गोविंद येतयेकर - सकाळ वृत्तसेवा
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून थेट शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेतील निष्ठावंत व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना डावलून त्यांना संघटनेत मानाचे पद देण्याची प्रथा शिवसेनेत सध्या सुरू आहे. मनसेच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी सांभाळणारे प्रकाश महाजन शिवसेनेत आल्यानंतर त्यांना आता थेट उपनेतेपद व प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे; तर मनसेतून आलेल्या अन्य काही पदाधिकाऱ्यांनाही शिवसेनेत लवकरच नवीन जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील चाणक्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खिंडार पाडून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जवळच्या शिलेदारांना गनिमी काव्याने शिवसेनेच्या सुरक्षित तटबंदी किल्ल्यात आणले. या शिलेदारांना विधानसभा निवडणुकीत तिकीट देण्याचे; अन्यथा पद देण्याचा शब्द देण्यात आला होता; पण निवडणुकांचा पाच महिन्यांचा काळ लोटला तरीही मनेसेतून शिवसेनेत आलेल्या शिलेदारांना पदे न दिल्याने त्यांच्यामध्ये अस्वस्थता पसरली होती.
संजय घाडी यांना निवडणुकीच्या काळातच उपनेतेपदाची जबाबदारी देऊन त्यांचा शिवसेनेत मान राखण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर आता शिवसेनेकडे चार प्रवक्ते असतानाही प्रकाश महाजन यांना प्रवक्तेपदी व उपनेतेपदाची जबाबदारी देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते; तसेच श्वेता परळकर यांनाही लवकरच नवीन जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते.
यापूर्वीचा इतिहास पाहता राज ठाकरे यांच्या जवळ असणाऱ्यांना शिवसेनेत मानाचे स्थान देण्यात आले आहे. विजय कदम भारतीय विद्यार्थी सेनेत असताना राज ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये मानले जायचे; पण मनसेत न जाता शिवसेनेत कायम राहिल्याबद्दल त्यांना उपनेतेपद देण्यात आले. मनसेत काही काळ झाल्यानंतर शिवसेनेत आलेल्या राजा चौगुले व दिगंबर कांडरकर यांना शिवसेनेत उपनेतेपद, हरीश वरळीकर व जितेंद्र जनावळे यांनाही शिवसेनेचे उपविभागप्रमुखपद देण्यात आले. याकडेही एका शिवसेनेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले; परंतु पक्षात अनेक वर्षे एकनिष्ठ राहूनही शिवसेनेतील जुन्या पदाधिकाऱ्यांना मानाचे पद मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त करून दाखविली.
मनसेमधून शिवसेनेत आलेल्यांना शिवसेनेतील चांगले पद देऊन त्यांचा सन्मान राखला जातो. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार संजय राऊत व आमदार नीलम गोऱ्हे यांच्याकडे प्रवक्तेपदाची जबाबदारी असताना आता महाजन यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्याची काय गरज काय, असा सवालही शिवसेनेतील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.