Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

राज्यसभा, विधान परिषदेसाठी कॉंग्रेसची मोर्चेबांधणी
-
Saturday, April 03, 2010 AT 12:15 AM (IST)

मधु कांबळे - सकाळ वृत्तसेवा

मुंबई -  जूनमध्ये होणाऱ्या राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी कॉंग्रेसमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राज्यसभेच्या दोन जागांसाठी विद्यमान खासदार विजय दर्डा, बाळासाहेब विखे-पाटील, अविनाश पांडे, हुसेन दलवाई, अनिस अहमद, निर्मला सामंत-प्रभावळकर आदी नावे चर्चेत आहेत. विधान परिषदेच्या तीन जागांसाठी मुझफ्फर हुसेन, प्रतापसिंह-मोहिते पाटील, आशीष कुलकर्णी, बाळासाहेब शिवरकर, नितेश राणे, अमर राजूरकर, गणेश पाटील यांच्यासाठी लॉबिंग सुरू झाले आहे.

विधानसभेच्या सदस्यांमधून राज्यसभेवर दोन व विधान परिषदेवर दहा जागा निवडून द्यावयाच्या आहेत. विधानसभेतील संख्याबळानुसार विधान परिषदेवर कॉंग्रेसचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. त्यासाठी पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू होणार आहे.

विधान परिषदेच्या 10 जागा 7 जुलै रोजी रिक्त होत आहेत. त्यात कॉंग्रेसचे संजय दत्त, मुझफ्फर हुसेन व मधू जैन, शिवसेनेचे दिवाकर रावते, सुरेश जेटलिया व अनिल परब, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिवाजीराव पाटील, मंदा म्हात्रे आणि भाजपचे प्रकाश शेंडगे व प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा समावेश आहे.

प्रकाश शेंडगे विधान सभेवर निवडून गेले आहेत, तर प्रतापसिंह मोहिते पाटील कॉंग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे कॉंग्रेसतर्फे मोहिते-पाटील यांचे नाव निश्‍चित मानले जात आहे. गेल्या सहा वर्षांतील संजय दत्त यांची कामगिरी उत्तम आहे. कॉंग्रेसचा "आम आदमीचा' अजेंडा प्रभावीपणे ते सभागृहात मांडतात. त्यांच्याबाबतीत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे अजून गुलदस्त्यात आहे. एखाद वेळेस त्यांच्यावर पक्षसंघटनेचीही काही जबाबदारी येऊ शकते. मधू जैन यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्‍यता कमी आहे. त्यांच्याऐवजी निर्मला सामंत-प्रभावळकर यांचा विचार होऊ शकतो; त्याशिवाय मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या खास मर्जीतील आशीष कुलकर्णी व अमर राजूरकर यांच्या नावाची चर्चा आहे. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यावतीने गणेश पाटील हे नाव पुढे येण्याची शक्‍यता आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांचे खास समर्थक बाळासाहेब शिवरकर यांचे नावही पुढे करण्याचे घाटत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महसूल मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनाही स्पर्धेत उतरविले जाईल, अशा हालचाली आहेत.

केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांचीही राज्यसभेची मुदत याचवेळी संपत आहे. पंजाबच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेले शिवराज पाटील यांच्या जागी राज्यसभेवर त्यांची वर्णी लावण्याबाबत चाचपणी सुरू आहे; परंतु राज्यात शिवसेना व मनसेने निर्माण केलेल्या मराठी-अमराठी वातावरणामुळे शर्मा यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्याबाबत पक्षश्रेष्ठींचा सध्या सावध पवित्रा असल्याचे समजते.

राज्यसभेवर दर्डा यांची पुन्हा वर्णी लागेल असे सांगण्यात येते. राज्यसभेच्याच निवडणुकीत राहुल बजाज यांच्याविरोधात व नंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत सागर मेघे यांच्याविरोधात पराभव पत्कराव्या लागलेल्या अविनाश पांडे यांचा या वेळी भक्कम दावा असल्याचे मानले जात आहे. त्यांच्या व्यतिरिक्त मुंबईतून निर्मला सामंत-प्रभावळकर, मुझफ्फर हुसेन, माजी मंत्री हुसेन दलवाई, अनिस अहमद यांच्याही नावाची चर्चा आहे. मुझफ्फर हुसेन यांचा विधान परिषद किंवा राज्यसभा असा दोन्हींसाठी विचार होऊ शकतो, असे संकेत आहेत. बाळासाहेब विखे-पाटील हेही स्पर्धेत येतील; परंतु लोकसभा निवडणुकीतील रामदास आठवले यांच्या पराभवामुळे दलितविरोधी राजकारणाचा मुद्दा पुढे करून त्यांना कॉंग्रेसमधूनच शह देण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्‍यता आहे.
प्रतिक्रिया
On 5/29/2010 5:42 PM ajeet kavathekar said:
हुसेन दल्वैना भेट ते पहिल्यांदाच सांगतील मi मराठी मुसलमान आहे आणि जे त्यांना ओळखतात ते पण तुम्हाला सांगतील किती साधे व्यक्तिमत्व आहे हुसेन भाई . जरा त्यांचा देशभक्त ग्रामीण मुस्लीम संघटनेचा - मौलाना आझाद विचार मंच महाराष्ट्र व महारष्ट्र ओबीसी संघटनेच्या पण कामाचा आढावा घ्या -- एका अतिशय चांगला माणूस आहे हुसेनभाई!!!!!


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: