बालेवाडी खूनप्रकरणातील आरोपी अद्याप फरारी
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, April 07, 2010 AT 12:00 AM (IST)
पिंपरी - अहमदाबाद येथील खासगी औषधनिर्मिती कंपनीच्या प्रतिनिधीचा खून दोन अज्ञात व्यक्तींनी केल्याचे स्पष्ट झाले. दोघेही फरारी असून, खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय मनोहर सावंत (वय 41, रा. यशोपुरम सोसायटी, चिंचवड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचे सहकारी जितेंद्र भगवान गिरासे (वय 24, रा. विवेकानंदनगर, नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली. सोमवारी (ता. 5) सकाळी दोघांनी पुण्यातील काही डॉक्टरांची भेट घेतली. दुपारी साडेबाराच्या सुमारास ते पाषाण येथील एनसीएल कंपनीजवळून दुचाकीवरून जात होते. त्या वेळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी सावंत यांच्याशी वाद घातला. त्यानंतर त्यांना दुचाकीवर बसवून ते घेऊन गेले.
सायंकाळी पाचच्या सुमारास सावंत यांचा मृतदेह बालेवाडी-म्हाळुंगे येथील क्रीडासंकुलामागे मोकळ्या मैदानात आढळला. त्यांच्या कपाळावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा होत्या. त्यांच्या खूनप्रकरणी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. मात्र, खुनाचे कारण समजू शकले नसल्याचे पोलिस निरीक्षक नंदकुमार भोसले यांनी सांगितले. फौजदार डी. डी. जगदाळे पुढील तपास करीत आहेत.