राज्य सरकारची नवीन लॉटरी योजना लवकरच
सकाळ वृत्तसेवा
Thursday, April 08, 2010 AT 12:00 AM (IST)
मुंबई - केंद्र सरकारने नवीन लॉटरी नियमानुसार दोन अंकी व तीन अंकी लॉटरीवर बंदी घातली असली, तरी यावर पर्याय म्हणून नवीन लॉटरी योजना लवकर सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. याबाबतचे संकेत आज अर्थराज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत दिले.
केंद्र सरकारने 1 एप्रिल 2010 पासून दोन व तीन अंकी लॉटरीवर बंदी घातली; मात्र याबाबतचे पत्र राज्य सरकारला 6 एप्रिलला मिळाले. त्यामुळे 1 एप्रिल ते 6 एप्रिल दरम्यानच्या दोन व तीन अंकी लॉटरीच्या सर्व सोडती काढण्यात आल्या असल्याचे
निवेदन वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केले. उद्यापासून (ता. 7) राज्यातील 2 व 3 अंकी लॉटरी योजना बंद करण्यात येणार आहे, त्यामुळे महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या सोडत योजनांमध्ये बदल करावा लागेल आणि लॉटरीच्या सोडती नवीन स्वरूपात काढाव्या लागतील, असे त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. उद्यापासून लॉटरी बंद होणार असल्याने ज्या नागरिकांनी 2 व 3 अंकी लॉटरीच्या सोडतीची तिकिटे विकत घेतली आहेत, त्यांना परतावा मिळण्याची व्यवस्था करण्यात आल्याचेही वडेट्टीवार यांनी विधानसभेत सांगितले.