Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

एसटीची आठ दिवसांत ८६ लाखांची कमाई!
सकाळ वृत्तसेवा
Thursday, April 08, 2010 AT 12:00 AM (IST)

धुळे - नांदुरी (जि. नाशिक) येथील श्री सप्तशृंगी देवीच्या चैत्र यात्रोत्सवात एसटीच्या धुळे विभागातून आठ दिवस जादा बस धावल्या. या काळात धुळे विभागाला धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून तब्बल 86 लाख 63 हजार 869 रुपयांचे घसघशीत कमाई झाली. या दोन्ही जिल्ह्यातील एक लाख 20 हजार भाविकांनी एसटीत बसमधून प्रवास करीत देवीचे दर्शन घेतले.

धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला यात्रेच्या काळात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. अधिकतर भाविक पदयात्रेने जातात. ज्यांना पदयात्रेने जाणे शक्‍य नसते, ते वाहनांनी जातात. त्यातही बहुतांश भाविक एसटी बसने जातात. या पार्श्‍वभूमीवर राज्य परिवहन महामंडळातर्फे दरवर्षी सप्तशृंग गडावर जाण्यासाठी जादा वाहतूक करण्यात येते. धुळे विभागांतर्गत असलेल्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विविध आगारातून यंदा ही 24 ते 31 मार्च दरम्यान जादा बस सोडण्यात आल्या. त्यासाठी एकूण 230 बसचा वापर झाला. यंदा यात्रेच्या आठ दिवसांच्या काळात एक हजार 854 फेऱ्या झाल्या. या काळात एसटी बस तीन लाख 25 हजार 397 किलोमीटर धावली. त्यातून धुळे विभागाला तब्बल 86 लाख 63 हजार 896 रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती महामंडळाच्या धुळे विभागातर्फे आज देण्यात आली.

मंडळाच्या धुळे विभागाने गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 12 लाख रुपयांचे उत्पन्न अधिक मिळविले. गेल्या वर्षी धुळे विभागाला 74 लाख 18 हजार 884 रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. तसेच एकूण एक लाख 17 हजार प्रवाशांची वाहतूक केली होती. गेल्यावर्षी एसटी 2 लाख 72 हजार 629 किलोमीटर धावली होती. यंदा ती सुमारे पन्नास हजार किलोमीटर अधिक धावल्याने उत्पन्नात वाढ झाली. तसेच यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत गडावर जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असल्याने उत्पन्नात वाढ झाली, असेही सूत्रांनी सांगितले.

एसटीच्या धुळे विभागातर्फे यात्रेच्या काळात प्रवाशांना विविध सोयी सुविधा देण्यात आल्या. त्यात पार्किंगसह भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंडप घालण्यात आला होता. तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी यात्रेच्या काळात 24 तास महामंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. धुळे ते गड या प्रवासात बसला काही अडचण निर्माण झाली, तर त्वरित दूर करण्यासाठी गस्ती पथक कार्यान्वित केले होते. बस सेवेचे नियोजन विभाग नियंत्रक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वाहतूक अधिकारी डी. पी. गावंडे, यंत्र अभियंता (चालन) एस. आर. सोनवणे, वाहतूक अधीक्षक अनुजा सोनार, यंत्र अभियंता डी. एस. आव्हाड आदींसह वाहक व चालकांनी प्रयत्न केले.

असे आगार, अशी कमाई
आगार फेऱ्या किलोमीटर उत्पन्न
धुळे 490 72 हजार 299 18 लाख 39 हजार 456
साक्री 236 39 हजार 809 10 लाख 60 हजार 960
नंदुरबार 234 48 हजार 975 12 लाख 95 हजार 619
शहादा 160 25 हजार 404 7 लाख 81 हजार 65
शिरपूर 250 49 हजार 672 14 लाख 18 हजार 80
अक्कलकुवा 72 14 हजार 165 3 लाख 56 हजार 690
शिंदखेडा 120 22 हजार 621 5 लाख 65 हजार 226
नवापूर 152 28 हजार 133 6 लाख 4 हजार 485
दोंडाईचा 140 29 हजार 319 7 लाख 42 हजार 287

उत्पन्न वाढतेच
वर्ष फेऱ्या उत्पन्न
2008 1453 69 लाख 85 हजार 599
2009 1603 74 लाख 18 हजार 884
2010 1854 86 लाख 63 हजार 869


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: