चिदंबरम यांच्या राजीनाम्याने भाजप कासावीस!
सकाळ वृत्तसेवा
Saturday, April 10, 2010 AT 12:30 AM (IST)
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली - छत्तीसगडमधील दंतेवाडा भागात माओवाद्यांनी घडविलेल्या भीषण हत्याकांडाची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या प्रस्तावाने भारतीय जनता पक्ष विलक्षण कासावीस झाल्याचे दिसून आले. मात्र, नक्षलवाद्यांशी लढण्याची मुख्य जबाबदारी राज्य सरकारची असते व छत्तीसगडमध्ये सध्या भाजपचे सरकार आहे हेच भाजपच्या 'मगरीच्या अश्रूंमागे' असलेले खरे कारण असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत पडले आहे.
दंतेवाडा चकमक प्रकरणी चिदंबरम यांनी कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देऊ नये, असे सांगून भाजपने गृहमंत्र्यांची वकिलीच सुरू केली. पक्षप्रवक्ते राजीव प्रताप रुडी यांनी सांगितले, की सध्याच्या परिस्थितीत गृहमंत्र्यांनी राजीनामा देऊ नये. तसे झाल्यास माओवाद्यांशी लढणाऱ्या सुरक्षा जवानांचे मनोधैर्य खच्ची होईल. पण 76 जवानांचा नरसंहार करणाऱ्या दृष्ट प्रवृत्तीचाही तो विजय ठरेल. दंतेवाडा हल्ला हा देशाच्या लोकशाहीवरील हल्ला असल्याने राजीनामा दिल्यास गृहमंत्री पाठ दाखवून पळतात, असा याचा अर्थ होईल. अर्थात, चिदंबरम हे "बक स्टॉप्स ऍट...' या स्वतःच्याच वाक्प्रचाराचे शिकार झाले आहेत, ही गोष्ट वेगळी. मात्र, काहीही झाले तरी त्यांनी राजीनामा देऊ नये.
अवघ्या महिनाभरापूर्वी संसदेत लिबरहान आयोगावरील चर्चेचे चिदंबरम उत्तर देत असताना प्रचंड गोंधळ घालणाऱ्या भाजपने त्यांच्याबद्दलची अचानक भूमिका बदलली. मंत्र्यांचा राजीनामा मागण्यास भाजप सदैव आतुर असल्याचे '26/11'च्या हल्ल्यानंतर अनेकदा दिसून आले आहे. मुंबई हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील यांचा राजीनामा मागताना भाजपने आक्रमक तेवढ्याच शिवराळ भाषेचा प्रयोग केला जात असे.
असे असताना चिदंबरम यांच्याविषयी भाजपला आता प्रेम का यावे, याबाबत राजधानीत चर्चेला उधाण आले. राजकीय तज्ज्ञांच्या मते, माओवाद्यांविरुद्ध कारवाई ही मुख्यतः राज्यांच्या अखत्यारीतील बाब असते. केंद्र सरकारची मुख्य जबाबदारी केवळ राज्यांना आवश्यक ती मदत पुरविण्याइतकीच असते. माओवाद्यांचा उच्छाद असलेल्या राज्यांत बिहार, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश ही भाजप किंवा भाजप आघाडीशासित राज्ये बहुसंख्येने आहेत. चिदंबरम यांनीच राजीनामा दिला तर ओघानेच छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही पुढे येणार. हे लक्षात आल्यानेच भाजपचे चिदंबरमप्रेम उतू जात असल्याचे दिसत आहे. दंतेवाडा प्रकरणी आता फार टीका न करता संसदेच्या अधिवेशनाचा मुहूर्त साधून सरकारवर टीका करायची, असा भाजपचा मानस होता. मात्र, चिदंबरम यांनी स्वतःच राजीनामा देऊ करून भाजपच्या या डावावर पाणी फिरविले. त्यामुळे अपेक्षाभंग झालेल्या भाजपने चिदंबरम यांचीच वकिली सुरू केली, असेही मानले जाते.
माओवादी हिंसाचाराबाबत 'लेप्ट विंग एक्ट्रिमिझम' हा शब्दप्रयोग रूढ झाला तो केंद्रातील भाजप आघाडी सरकारच्याच काळात! तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवानी हे या शब्दाचा वापर मुक्तपणे करीत, असे सांगितले जाते. यामागे डाव्यांना झोडपणे हाही भाजपचा उद्देश होताच. त्यामुळे आता माओवाद्यांच्या हिंसाचाराबाबत गृहमंत्र्यांवर टीका केली तर तेव्हा अडवानी जी उक्ती व कृती करत होते तिलाही छेद दिल्यासारखे होईल या विचारानेही भाजपला चिदंबरम यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे वाटत असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.