Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

पंतप्रधानांच्या दौऱ्यात हेडलीवर होणार चर्चा
सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, April 11, 2010 AT 12:45 AM (IST)
उत्तम कांबळे - सकाळ न्यूज नेटवर्क
पंतप्रधानांच्या विमानातून - जगातील चाळीसहून अधिक राष्ट्रप्रमुख सोमवार (ता. 12) पासून अमेरिकेत दोन दिवस चालणाऱ्या आण्विक सुरक्षेवरील शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देशांचे प्रमुख एकत्र येऊन या विषयावर शिखर परिषद घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन दहशतवादी डेव्हिड हेडली याच्या प्रत्यार्पणाबाबतचा मुद्दा पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान अधिकारी स्तरावरील बैठकीत उपस्थित होण्याची शक्‍यता आहे. डॉ. मनमोहनसिंग आणि बराक ओबामा यांच्यात परिषदेच्या एक दिवस अगोदर म्हणजे रविवारी बैठक होणार आहे.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन आणि परराष्ट्र खात्याचे इतर वरिष्ठ अधिकारी पंतप्रधानांसमवेत आहेत. इतर देशांचे प्रमुख उद्या (ता. 11) आणि परवा (ता. 12) वॉशिंग्टनमध्ये दाखल होणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या परिषदेत आण्विक शस्त्रे दहशतवाद्यांच्या हातात पडणार नाहीत, याविषयी गंभीर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. गेल्या काही वर्षांत जगात वाढलेल्या दहशतवादी कारवाया, अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरपासून ते जगात ठिकठिकाणी झालेले हल्ले, तसेच त्यात गेलेले निष्पाप लोकांचे बळी आणि आण्विक सामग्री मिळविण्यासाठीची दहशतवाद्यांची धडपड या पार्श्‍वभूमीवर बैठकीला विशेष महत्त्व आहे.

'अल्‌ कायदा' या दहशतवादी संघटनेचा आण्विक हल्ल्याचा उच्चार, तसेच जगाच्या स्थैर्याला आव्हान देणाऱ्या कारवाया वाढत आहेत. सैतानांच्या हातात ही शस्त्रे जाऊ नयेत, यासाठी जगाने पुढाकार घेतला आहे. भारतानेही गेल्या 10-15 वर्षांत जागतिक शांततेसाठी आग्रह धरला आहे. आता अमेरिकेच्या पुढाकाराने होत असलेल्या शिखर परिषदेला विधायक प्रतिसाद देण्याचे भारताचे प्रयत्न आहेत. या परिषदेला चांगली पार्श्‍वभूमी लाभावी, यासाठी अण्वस्त्र कपातीबाबत अमेरिका आणि रशियाने नुकताच करार केला आहे. गेल्या वर्षी झालेल्या जी-आठ देशांच्या बैठकीत त्यांनी आवाज उठविला होता. संयुक्त राष्ट्रांत अनेक ठराव झाले आहेत, होत आहेत. चुकीच्या शक्तींकडे अण्वस्त्रे गेल्यास त्याचे काय परिणाम होतील, याबाबत संकेत दिले जात आहेत. समृद्ध युरेनियमचा विकासकामांसाठी मर्यादित, जबाबदारीने आणि गांभीर्याने वापर सुचविला जात आहे. अतिसंहारक अशी साठ हजार अण्वस्त्रे बनविली जातील, इतका साठा जगातील वेगवेगळ्या राष्ट्रांकडे आहे. आण्विक अस्त्रे सुरक्षा, त्यांचा मर्यादित वापर आणि त्यांचे दहशतवाद्यांपासून संरक्षण या मुद्द्यावर जपानने गेल्या वर्षी आशियातील राष्ट्रांची बैठक घेतली होती. नेदरलॅण्डनेही असाच प्रयोग केला होता. आण्विक पुरवठा करणाऱ्या 46 राष्ट्रांना मार्गदर्शन करण्यावर यापूर्वीच भर देण्यात आला आहे. आता या परिषदेत ठोस पावले आणि ठोस कार्यक्रम निश्‍चित केला जाणार आहे.

विमानात पत्रकारांशी बोलताना श्री. मेनन म्हणाले, की डॉ. मनमोहनसिंग आणि बराक ओबामा यांच्यात परिषदेच्या एक दिवस अगोदर बैठक होणार आहे. या बैठकीत द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होईल. दहशतवादी हेडली याच्या प्रत्यार्पणाबाबतचा मुद्दा आपण अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जनरल (निवृत्त) जेम्स जोन्स यांच्या समवेतच्या बैठकीत उपस्थित करू. हेडलीचे प्रकरण भारताला आपल्या देशाच्या कायद्यानुसार हाताळायचे आहे. गेल्या सहा महिन्यांत उभय देशांदरम्यान महत्त्वाच्या घटना घडल्या. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही भारताला अलीकडेच भेट दिली होती. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा हेदेखील जूनमध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

आशियातील राजकीय घडामोडींसह पाकिस्तान तसेच अफगाणिस्तानमधील चिंताजनक बनलेल्या राजकीय परिस्थितीबाबतही चर्चा होण्याची शक्‍यता आहे.
फोटो गॅलरी

प्रतिक्रिया
On 30/09/2010 03:08 PM To Manmohan said:
whay manmohan singh is behave like slave in front of Pak and USA.. we really required a fit and fine as well as educated PM like Modi..
On 11/04/2010 18:02 anuradha rajiv rajurkar said:
A very worried and concerned India is likely to raise the issue of the security of Pakistan''s nuclear arsenal during a bilateral meeting at Blair House ...


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: