Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

'रोहयो'ची कामे त्वरित सुरू करा
सकाळ वृत्तसेवा
Sunday, April 11, 2010 AT 11:30 PM (IST)

नाशिक - किमान उन्हाळ्यामध्ये ग्रामीण भागात शेतमजूर आणि गरजू नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यादृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद यांच्यातर्फे तालुकानिहाय संपर्क दौरे सुरू करून प्रत्येक तालुक्‍यात 500 मजुरांना तत्काळ रोजगार उपलब्ध होण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी पी. वेलरासू, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. जी. वाघ, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत महाजन, उपजिल्हाधिकारी अनंत सोनवणे, प्रा. कैलास मोरे यांच्या उपस्थितीत प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी आढावा बैठकी झाल्या. त्यात रोजगार हमी योजनेच्या कामांची माहिती घेण्यात आली. या बैठकींना सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी, अभियंता, वनविभागाचे कर्मचारी यांना आमंत्रित करण्यात आले. पहिल्या टप्प्यात त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, नांदगाव, मालेगाव व येवला या आठ तालुक्‍यांत योजनेच्या कामांवर प्रत्येक दिवशी किमान 500 मजूर उपस्थित राहतील व त्यांना पुरेशी कामे तत्काळ सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी वेलरासू यांनी संबंधित यंत्रणेला दिले. ही कामे 15 एप्रिलपर्यंत सुरू करावयाची आहेत. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित तालुक्‍यांमध्ये होणाऱ्या रोहयो कामांसाठी प्रत्येक दिवसाला 200 मजूर उपस्थित राहतील, इतकी कामे सुरू करावयाची आहेत. कामांचे नियोजन करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने "मजूर सभा व ग्रामसभा' घेण्याबाबतही सूचना करण्यात आली आहे. मजुरांनी कामाची मागणी केल्यास त्वरित कामे उपलब्ध करून देण्याबाबत आदेश देण्यात आले असून, त्यात कसूर करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

'रोहयो'साठी मिळणाऱ्या सुविधा
एखाद्या कामावर 20 मजूर असतील, तर त्यांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी 105 रुपये रोजाने एक कर्मचारी देता येऊ शकतो. मजुरांची अवजारे असल्यास त्यांना अवजारांसाठी भाडे मिळू शकते. महिला मजूर असल्यास दहा मुलांमागे त्यांचा सांभाळ करण्यासाठी एक आया. गर्भवती मजूर महिलेने 75 दिवस रोहयोचे काम केल्यास 30 दिवसांची पगारी रजा. प्रथमोपचाराची सोय मिळू शकते.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: