ओबामा-मनमोहनसिंग भेटीत पाक-अफगाणिस्तानवर चर्चा
सकाळ वृत्तसेवा
Monday, April 12, 2010 AT 12:49 AM (IST)
उत्तम कांबळे - सकाळ न्यूज नेटवर्क
वॉशिंग्टन - पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची आज येथे भेट घेतली. आण्विक सुरक्षेसह अमेरिकेकडून पाकिस्तानला दिली जाणारी लष्करी मदत, तसेच पाकिस्तान व अफगाणिस्तानमधील अस्थिर परिस्थिती या कळीच्या मुद्द्यांवर उभय नेत्यांदरम्यान चर्चा झाल्याचे समजते. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री बारानंतरही ही चर्चा सुरू होती.
येथे उद्यापासून (ता. 12) सुरू होणाऱ्या आण्विक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर डॉ. सिंग आणि ओबामा यांच्यादरम्यान ही द्विपक्षीय चर्चा झाली. ओबामा यांच्या शासकीय अतिथिगृहात ही भेट झाली. पंतप्रधानांच्या गेल्या वर्षातील अमेरिका दौऱ्यानंतर तब्बल पाच महिन्यांनंतर दोन्ही नेते एकमेकांना भेटले. यापूर्वी गेल्या वर्षी 24 नोव्हेंबरला डॉ. सिंग येथील "व्हाइट हाउस'मध्ये ओबामा यांना भेटले होते.
या चर्चेदरम्यान वादग्रस्त आण्विक उत्तरदायित्व विधेयकाबाबतही उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. हे विधेयक सध्या लोकशाही प्रक्रियेतून जात असून, ते संसदेत लवकरच मंजूर होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी ओबामा यांच्याकडे व्यक्त केला. आण्विक सुरक्षा परिषदेच्या पार्श्वभूमीवर मनमोहनसिंग एक दिवस अगोदरच येथे दाखल झाले होते. या परिषदेत चाळीसपेक्षा अधिक राष्ट्रप्रमुख सहभागी होत असून, ओबामा यांनी परिषदेच्या एक दिवस अगोदर डॉ. सिंग यांना भेटण्यासाठी वेळ दिला. ही बाब आण्विक सुरक्षा परिषद, तसेच भारताच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. भारताच्या अफगाणिस्तानबाबतच्या भूमिकेवरही या वेळी चर्चा झाल्याचे समजते. पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन दहशतवादी डेव्हिड हेडली याच्या प्रत्यार्पणाबाबतचा मुद्दा या दौऱ्यात उपस्थित केला जाणार असल्याचा पुनरुच्चार काही भारतीय अधिकाऱ्यांनी या भेटीनंतर केला.
दोन्ही देशांमधील चर्चेतील मुद्दे
- अमेरिकेकडून पाकिस्तानला होणारी लष्करी मदत भारतासाठी चिंताजनक
- अफगाणिस्तानातील खडतर परिस्थिती, भारताने अफगाणिस्तानातील योगदान कायम ठेवण्याची अमेरिकेची इच्छा
- आण्विक उत्तरदायित्व विधेयक संसदीय प्रक्रियेत असल्याचे पंतप्रधानांकडून स्पष्ट
- भारताच्या अणुक्षेत्रात रशिया आणि फ्रान्सच्या कंपन्या उत्सुक असल्यामुळे अमेरिकी कंपन्यांकडून दबाव
- इराणवरील कडक निर्बंधांसाठी अमेरिकेचे प्रयत्न