गडकरी हे तर संघाचे 'एक्स्टेन्शन बोर्ड' - कॉंग्रेस
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, April 13, 2010 AT 12:15 AM (IST)
नवी दिल्ली - "भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक्स्टेन्शन बोर्ड (अतिरिक्त मंडळ) आहेत. त्यांनी केलेल्या टीकेची दखल घ्यावी, एवढे त्यांचे राजकीय वजन नाही,'' अशा शब्दांत कॉंग्रेसने गडकरी यांच्यावर टीका केली. कॉंग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांच्यावर गडकरी यांनी नुकतीच टीका केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या कॉंग्रेसने गडकरींवर हल्ला चढविला.
गडकरी यांच्या अध्यक्षपदी निवडीनंतरच प्रथमच एवढ्या कठोर शब्दांत कॉंग्रेसने टीका केली आहे. यामुळे दोन्ही पक्षांदरम्यान नवे शाब्दिक युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दंतेवाडा येथील माओवाद्यांचा हल्ला आणि त्यानंतर कथित राजीनामा नाट्यामुळे अडचणीत आलेल्या गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या पाठीशी कॉंग्रेसबरोबरच भाजपनेही ठामपणे उभे राहिल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये दिसणारा सलोखा आजच्या परस्परटीकेमुळे नष्ट झाल्याचे दिसत आहे. राहुल गांधी यांना पायाभूत क्षेत्राबद्दलचा अल्प अनुभव आहे, असा टोला गडकरी यांनी चेन्नई येथील कार्यक्रमात लगावला होता. त्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांना छेडले असता त्यांनी, गडकरी यांची "आरएसएस'चे दिल्लीतील एक्स्टेन्शन बोर्ड' म्हणून खिल्ली उडविली. भाजप अध्यक्षांबद्दल आपल्याला आदर असल्याचे सांगणाऱ्या तिवारी यांनी मात्र, "पक्षाच्या व्यासपीठावरून उत्तर देण्याएवढे त्यांचे राजकीय वजन वाढलेले नाही', असे फटकारले.
दरम्यान, कॉंग्रेसच्या एका नेत्याने गडकरी यांनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेमागे विशिष्ट हेतू असल्याचे बोलून दाखविले. भाजपला आता कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर टीका करणे शक्य नाही. तसे केल्यास अंगलट येण्याची भीती असल्याने आता या पक्षाने नव्या नेतृत्वाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न चालविला आहे. गडकरी यांची आतापर्यंतची विधानेही तसाच संकेत देणारी असल्याकडेही या नेत्याने लक्ष वेधले.