दहा रुपयांवरून बालकाला टाकले गरम कढईत
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, April 13, 2010 AT 12:15 AM (IST)
पाटणा - उसने घेतलेल्या पैशांच्या वादावरून एक वर्षाच्या बालकाला तापलेल्या कढईत टाकण्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना बिहारमध्ये सोमवारी घडली. या बालकाची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर स्थानिक डॉक्टर उपचार करीत आहेत.
मुजफ्फर जिल्ह्यातील देवयाना पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ही घटना घडली. सुरेंद्र पासवान आणि मंजू पासवान या दोघांमध्ये केवळ दहा रुपयांवरून वाद सुरू होता. सुरेंद्रने मंजूकडून दहा रुपये उधार घेतले होते. ते परत करण्यास सुरेंद्र टाळाटाळ करीत होता. याच विषयावरून दोघांमध्ये रविवारी सायंकाळपासून बाचाबाची सुरूच होती. चिडलेल्या सुरेंद्रने सोमवारी मंजूच्या घरी जाऊन त्याच्या एक वर्षाच्या मुलाला तापलेल्या कढईत टाकून दिले. कढई गरम असल्याने तो बालक गंभीर जखमी झाला. सुदैवाने या कढईत तेल किंवा पाणी नव्हते. घटनेनंतर सुरेंद्र फरार झाला आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी तपास मोहीम सुरू केली आहे. मात्र, तो अद्याप सापडला नाही.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सुरेंद्र या परिसरातील गावांमध्येच लपलेला असण्याची शक्यता आहे. त्याला ताब्यात घेतले नसल्याने गावकऱ्यांनी पोलिसांच्या कार्यभारावर शंका व्यक्त केली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राज्य मुख्यालयाने याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा अहवाल त्वरित देण्याचे सांगण्यात आले आहे. गृहसचिव आमीर सुबहानी यांनी सांगितले, की मुजफ्फरनगरमध्ये घडलेली घटना अमानुष आणि निंदनीय आहे. या प्रकरणाची शासनाने गांभीर्याने दखल घेतली असून, सुरेंद्रला अटक करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.