Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

गोविंदाचार्यांचे गडकरींना पत्र
सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, April 14, 2010 AT 12:00 AM (IST)

नवी दिल्ली - भाजपचे माजी नेते गोविंदाचार्य यांनी पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांना पत्र लिहिले आहे. पक्षाच्या अंतर्गत राजकारणात गडकरी आणि प्रवक्‍त्यांकडून आपल्याला बळी बनवले जात असून, भाजपमध्ये परतण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे.

गोविंदाचार्य यांनी सप्टेंबर 2003 मध्ये भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांना पुन्हा पक्षात आणण्याचे संकेत गडकरी यांनी दिले होते. गोविंदाचार्य यांनी गडकरींना दिलेल्या पत्राची प्रत प्रसारमाध्यमांनाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात गोविंदाचार्य यांनी म्हटले आहे, की मी सप्टेंबर 2003 मध्ये पक्षाच्या सदस्यत्वाचे नूतनीकरण केले नाही आणि आता मला पक्षात परतण्याची इच्छाही नाही. मी 2000 मध्ये अभ्यासासाठी सुट्टीवर गेलो होतो. सत्तेच्या राजकारणाचा भाग व्हायचे नसल्यामुळे तीन वर्षांनंतर मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. मी आजही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक असून, माझ्या पद्धतीने देशसेवा करत राहणार आहे.

भाजपमधील सूत्रांनी गोविंदाचार्य पक्षात परततील, असा गौप्यस्फोट केला होता. गोविंदाचार्य यांनी ते कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थेशी संबंध नसल्याचे सांगितले होते, त्यामुळे या चर्चांना आणखी पाठबळ मिळाले होते.

दरम्यान, उमा भारती यांच्या पक्षात परतण्याविषयी गडकरी यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्याशी चर्चा केली. उमा भारती यांच्या पक्षप्रवेशाला त्यांचा विरोध असण्याची शक्‍यता आहे.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: