Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

सोशल क्‍लबच्या नावाखाली जुगार अड्डा
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, April 14, 2010 AT 12:45 AM (IST)

जळगाव - क्रीडा क्‍लब, सोशल क्‍लबचे नाव लावून पैसे लावून जुगार खेळणाऱ्या शहरातील अड्ड्यावर पोलिस विभागाने छापा मारला. यात 56 जणांना अटक करण्यात आली आहे. यात एक लाख अकरा हजार रुपये रोख रक्कमेसह साहित्य जप्त करण्यात आले. या क्‍लबच्या मूळ मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिस विभागातर्फे रात्री देण्यात आली.

आज सायंकाळी सव्वा पाचच्या दरम्यान शहरातील कोंबडी बाजार भागासह पी. के. प्लाझा व बी. जे. व्यापारी संकुलात अपर पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, सहायक पोलिस अधीक्षक इश्‍यू संधू व परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक मनिता मलिक या तिघांच्या पथकाने एकाच वेळी पोलिस ताफ्यासह धाड टाकली. कोंबडी बाजार भागातील राज सोशल क्‍लब या ठिकाणी अपर पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, पोलिस निरीक्षक किरण धात्रक, सहायक निरीक्षक दीपक लगड, उपनिरीक्षक प्रशांत मन्साराम आदींसह दहा पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. यात अकरा जणांना अटक करण्यात आली. याच्याकडून 34 हजार 300 रोख व जुगाराची साधने जप्त करण्यात आली. या बाबत जिल्हापेठ पोलिसात रात्री उशिरा गुन्हा नोंदविला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, हा जुगार अड्डा कोल्हे नामक व्यक्तीचा असल्याची माहिती पुढे आली आहे. या संदर्भात खात्रीकरून त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला जाईल, असे अपर अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले. या ठिकाणी लावलेल्या क्‍लबच्या फलकावर तुषार चंद्रकांत भारंबे, अनिल शालिक मराठे, यतीन चंद्रकांत पाटील, योगेश विठ्ठल भंगाळे यांची नावे होती.

दुसरा छापा बी. जे. मार्केट समोरील शिरसाळे व्यापारी संकुलातील (कै.) केशव शिरसाळे क्रीडा मंडळाच्या कार्यालयात परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक मनिता मलिक यांच्यासह पथकाने टाकला. या ठिकाणी 13 जणांना पैसे लावून जुगार खेळताना अटक करण्यात आली. 9 हजार 30 रुपये हस्तगत करण्यात आले. या दोन्ही घटनेची नोंद रात्री दहापर्यंत जिल्हा पेठ पोलिसात झालेली नव्हती.

तिसरा छापा जुन्या बसस्थानकाजवळील पी. के. प्लाझा येथे सहायक पोलिस अधीक्षक इश्‍यू संधू, पोलिस निरीक्षक नागेश जाधव यांनी टाकला. यात विना परवाना अनधिकृतरीत्या पैसे लावून जुगार खेळताना तब्बल 32 जणांना पकडण्यात आले. त्यांच्या जवळून रोख रक्कमेसह 67 हजार 700 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. या ठिकाणी ब्रिजलाल वालेचा या मालकास तर व्यवस्थापक कैलास बाहेती यांना पकडण्यात आले. या ठिकाणी श्री गणेश क्रीडा मंडळाचा फलक लावण्यात आला होता. यात संस्थापक अध्यक्ष नवनाथ दारकुंडे, राहुल बाविस्कर, सुरेश तलरेजा, शालीक सपकाळे व चेतन आळंदे यांची नावे होती. मात्र, चालकाकडून कुठलाही नोंदणीचा कागद नव्हता. तीन खोल्यांमध्ये हा क्‍लब चालत असल्याचे दिसून आले. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसात करण्यात आली नव्हती.

जुगार अड्डेच - अधीक्षक रस्तोगी
कुठलाही क्‍लब किंवा मंडळाच्या ठिकाणी सभासदांची यादी असते. मात्र, या ठिकाणी काहीही आढळून आले नाही. तसेच पैसे लावून जुगार खेळत असल्याचे दिसून आले आहे. या मुळे मुंबई जुगार ऍक्‍ट खालीच गुन्हे दाखल होतील, असे पोलिस अधीक्षक संतोष रस्तोगी यांनी सांगितले.

सूचना अन सुविधा देखील
छापा टाकण्यात आलेल्या मंडळाच्या ठिकाणी जुगार खेळण्याची नियमावलीसह खेळण्यासाठी अनामत रक्कम किती रुपयाची असावी याचा फलक लावण्यात आलेला होता. तसेच विजेत्या जुगाऱ्यास किती रक्कम मिळेल याचाही नामोल्लेख होता. दरम्यान, या ठिकाणी जुगाराच्या सेवेत एसी, चहा, शुद्ध पाण्याची सोय होती.
प्रतिक्रिया
On 14/12/2010 08:05 PM Lata said:
हप्ता मिळाला नसेल त्यांना , म्हणून पकडले
On 12/10/2010 08:29 AM shashikantpatil said:
action taken by police is not sufficient.can police show the courage to stop the similar clubs run by bhartiy krida sanstha jalgaon
On 9/16/2010 10:11 AM Yogita Pandurang Chaudhari said:
असच चांगले काम करणेसाठी पोलिसांना शुभेचछा.
On 6/13/2010 11:49 AM pradeep pendhare said:
जळगाव पोलिस विभागाने अभिनदन.....


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: