दहशतवादाविरोधात भारताला अमेरिकेची दुप्पट मदत
पीटीआय
Friday, April 16, 2010 AT 12:15 AM (IST)
वॉशिंग्टन - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर उच्चस्तरीय प्रशिक्षणासाठी भारताने केलेल्या विनंतीनुसार, दहशतवादविरोधी लढ्यासाठी भारताला देण्यात येणारी मदत दुप्पट करत 45 लाख डॉलरपर्यंत वाढविण्याचे आवाहन ओबामा सरकारने अमेरिकी कॉंग्रेसला केले आहे.
भारताच्या विनंतीनंतर मदत वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयातील दहशतवादविरोधी लढ्याचे समन्वयक डॅनियल बेंजामिन यांनी कॉंग्रेसच्या समितीसमोर बोलताना सांगितले. ते म्हणाले, ""भारताने केलेल्या मागणीनुसार, मुंबईवरील हल्ल्यानंतर प्रशिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अधिकाधिक मदतीची गरज व्यक्त केली होती. त्यानुसार, 2011 या आर्थिक वर्षात भारताला करण्यात येणारी मदत दुप्पट करत 45 लाख डॉलरपर्यंत नेण्यात येणार आहे.'' दहशतवादाविरोधातील कारवाईच्या दृष्टीने अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येत असून, गेल्या वर्षी याला ठोस यश मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.
ओबामा सरकारने 2011 वर्षासाठी पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी लढ्याला 1.2 अब्ज डॉलरची मदत देण्याची मागणी केली आहे. या वर्षी प्रथमच निधीचा पूर्ण वापर करण्याची संधी परराष्ट्र विभागाला मिळणार आहे. पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांत आणि आदिवासी भागांतील दहशतवाद्यांविरोधात लढणाऱ्या सुरक्षा दलांची क्षमता वाढविण्यासाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ""अफगाणिस्तानातून कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या काही भागात सुरक्षित आसरा मिळत आहे. हा सुरक्षित आसरा नष्ट करण्यासाठी पाकिस्तानी सुरक्षा दलांची क्षमता वाढविणे आवश्यक आहे. त्यामुळे पाकिस्तानी सुरक्षा दलांना अद्ययावत उपकरणे आणि प्रशिक्षण देण्याबरोबरच, या भागाचा विकास करण्यासाठी अमेरिकेने पाच वर्षांची योजना आखली आहे. या 7.5 अब्ज डॉलरच्या मदतीवर अमेरिकेचे वाढते लक्ष आणि त्याच्या अंमलबजावणीच्या पद्धतीवरून मतभेद आहेत.''