जामिनासाठी साध्वी प्रज्ञासिंह उच्च न्यायालयात
-
Friday, April 16, 2010 AT 12:00 AM (IST)
मुंबई - नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयास आपल्या जामीनअर्जावर सुनावणी घेण्याचा आदेश द्यावा, या मागणीसाठी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिने उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.
तिने आज ऍड. गणेश सोवनी यांच्यामार्फत हा अर्ज केला असून त्यावर 26 एप्रिल रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. सन 2008 मधील या बॉम्बस्फोटात सहा जण मरण पावले होते.
या प्रकरणातील आरोपींवरील मोकानुसारचे आरोप रद्द करण्याचा आदेश नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयाने दिला होता. त्यास राज्य सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या वेळी नाशिकच्या न्यायालयातील या खटल्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती, त्यामुळे आता नाशिकचे कनिष्ठ न्यायालय आपला जामीनअर्जही ऐकणार नाही, अशी भीती व्यक्त करून साध्वीने हा अर्ज केला आहे.
मागील महिन्यात साध्वीने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता; मात्र तो फेटाळण्यात आला होता. तेव्हा आपल्याविरुद्ध 90 दिवसांत आरोपपत्र सादर झाले नाही, या मुद्द्यावर तिने हा अर्ज केला होता; मात्र आता आपल्याविरुद्धच्या आरोपपत्रांत त्रुटी असल्याने आपल्याला नवा जामीनअर्ज करायचा आहे, असा तिचा दावा आहे.