Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

माणिकराव म्हणतात, दिल्लीची मर्जी कायम!
सकाळ वृत्तसेवा
Sunday, April 18, 2010 AT 12:00 AM (IST)

मुंबई -  देशात सभासद नोंदणीच्या मोहिमेत तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसने पक्षाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचे विविध कार्यक्रम राबविण्यात आघाडी घेतली आहे. दिल्लीत नुकत्याच झालेल्या सर्व राज्यांच्या प्रांताध्यक्षांच्या बैठकीत पक्षश्रेष्ठींनी प्रदेश कॉंग्रेसची प्रशंसा केल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे. सदस्यनोंदणीवरून दिल्लीत आपल्याबद्दल नाराजी नाही, किंवा पालिका निवडणुकांतील पराभवामुळे आपल्या पदाला कोणताही धोका नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.

दिल्लीत 8 एप्रिल रोजी कॉंग्रेसनेते ऑस्कर फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सभासद नोंदणीत महाराष्ट्र पिछाडीवर राहिल्याबद्दल प्रदेश कॉंग्रेसवर शरसंधान झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या वृत्ताचा माणिकराव ठाकरे यांनी इन्कार केला आहे. कॉंग्रेसच्या सभासद नोंदणी पद्धतीत पहिल्यांदाच मूलभूत बदल करण्यात आला आहे. पूर्वी प्राथमिक व क्रियाशील अशी दोन प्रकारे सभासद नोंदणी केली जात होती. एका बूथवर 25 प्राथमिक सदस्य झाले की, एका क्रियाशील सभासदाची नोंद केली जात होती. परंतु आता प्राथमिक व क्रियाशील असे दोन्ही प्रकार बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक निवडणूक होण्यासाठी कमीत-कमी 25 सदस्यांच्या नोंदणीचा कोटा पूर्ण करण्यात आला. काही ठिकाणी त्यापेक्षा जास्त नोंदणी झाली. तांत्रिकदृष्ट्या शंभर टक्के सभासद नोंदणी झाली; परंतु संघटनात्मक विस्तारासाठी आणखी सदस्य संख्या वाढविली पाहिजे, अशी बैठकीत चर्चा झाली. अन्य तीन-चार राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सदस्य नोंदणी कमी झाल्याचे ठाकरे यांनी मान्य केले. परंतु, सभासद नोंदणीची मोहीम पुन्हा गतिमान करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

दिल्लीत 11 एप्रिल रोजी संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेस स्थापनेच्या 125 व्या वर्धापनदिनानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी सर्व राज्यांच्या प्रांताध्यक्षांची बैठक झाली. अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या निर्देशानुसार सर्वाधिक व विविध प्रकारचे कार्यक्रम राबविण्यात महाराष्ट्राने आघाडी घेतल्याचे सिद्ध झाले. त्याबद्दल कार्यक्रम आयोजन समितीचे निमंत्रक जनार्दन द्विवेदी यांनी प्रदेश कॉंग्रेसची प्रशंसा केल्याची माहिती माणिकराव ठाकरे यांनी दिली.

पालिका निवडणुकांचा परिणाम नाही
नवी मुंबई तसेच औरंगाबाद महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांत झालेल्या पराभवामुळे आपले पद धोक्‍यात आल्याच्या वृत्ताचेही माणिकराव ठाकरे यांनी खंडन केले. मुळात या दोन्ही महापालिकांमध्ये कॉंग्रेसची सत्ता नव्हती, त्यामुळे काही गमावले, असे म्हणता येणार नाही. नवी मुंबईत स्वबळावर लढल्यामुळे उलट 13 जागा मिळाल्या. ऐरोली विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रभागांमध्ये कॉंग्रेस उमेदवारांच्या मतांची संख्या 42 हजार आहे. 11 उमेदवार फार कमी मताने पराभूत झाले आहेत. औरंगाबादमध्ये तीच अवस्था आहे. वॉर्डा-वॉर्डात संघटना पोचविणे महत्त्वाचे होते. पुढील काळात त्याचे चांगले परिणाम पहायला मिळतील, असा दावा त्यांनी केला.
 
प्रतिक्रिया
On 15/10/2010 05:13 PM GURUPRASAD KULKARNI said:
हाकलून द्यायला हवे


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: