साईनावर जास्त दडपण नको - गोपीचंद
-
Monday, April 19, 2010 AT 12:37 AM (IST)
नवी दिल्ली - आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत साईना नेहवालला अग्रमानांकन होते; पण त्यानंतरही तिला उपांत्य फेरीत हार पत्करावी लागली. त्यामुळे तिची कामगिरी लौकिकास साजेशी झाली नाही, अशी टीका सुरू झाली आहे; पण तिच्या उपांत्य फेरीतील पराभवातून फार अर्थ शोधू नका, असा सल्ला तिचे प्रशिक्षक गोपीचंद यांनी दिला. ""उपांत्य लढतीच्या वेळी घरच्या कोर्टवर खेळण्याचे जास्तच दडपण साईनावर आले होते. तिने गेल्या काही वर्षांत कमालीच्या वेगाने प्रगती करताना अनेक महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्या आहेत. भविष्यातही महत्त्वाच्य स्पर्धा जिंकण्याची तिची क्षमता आहे. मात्र, तिच्यावर आपण जास्त दडपण येणार नाही याचीही खबरदारी घ्यायला हवी,'' असे गोपीचंद यांनी सांगितले.