मुंबईला कृत्रिम पावसासाठी आर्थिक मदत नाही
सकाळ वृत्तसेवा
Thursday, April 22, 2010 AT 12:15 AM (IST)
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली - मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग गेल्या वर्षी मुंबई महापालिकेने केला होता. यंदाही हा प्रयोग महापालिकेला स्वत:च्या निधीतूनच करावा लागेल. त्यासाठी केंद्र सरकार आर्थिक मदत देणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी'तर्फे देशात काही ठिकाणी 2008 ते 2012 पर्यंत कृत्रिम पाऊस प्रायोगिक तत्त्वावर पाडला जाणार आहे. जुलै ते ऑगस्टदरम्यान हा प्रयोग केला जातो. खासदार नीतेश राणे यांनी कृत्रिम पावसाचा हा प्रयोग मुंबईसाठी केला जाणार का, असा प्रश्न लोकसभेत उपस्थित केला होता. त्याला लेखी उत्तर देताना विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात यंदा ठरल्याप्रमाणे हा प्रयोग होईल. मात्र, मुंबईसाठी कृत्रिम पाऊस पाडण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.