पुरुष विभागात कोल्हापूरचा नवभारत संघ अजिंक्य
-
Tuesday, April 27, 2010 AT 12:00 AM (IST)
पुणे - अनुबंध सेवा प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात कोल्हापूरच्या नवभारत शिरोली संघ, तर महिला गटात पुण्याच्या सुवर्णयुग स्पोर्टस क्लबने विजेतेपद मिळविले.
नातूबाग येथील सरस्वती मंदिर प्रशालेच्या मैदानावर संपलेल्या या स्पर्धेतील दोन्ही गटांतील अंतिम लढती मॅटवर खेळविण्यात आल्या. पुरुष व महिला गटात अनुक्रमे नगरच्या सहयोग क्रीडा मंडळ व विरमाता जिजाऊ संघाने तिसरा क्रमांक मिळविला.
पुरुषांमध्ये सुनील पाटीलने केलेल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर कोल्हापूरच्या नवभारत संघ शिरोली संघाने मुंबईच्या सुनील स्पोर्टस क्लबवर चुरशीच्या लढतीत 37-33 असा केवळ चार गुणांनी विजय मिळविला. पूर्वार्धात नवभारत संघाने 10-9 अशी एक गुणाची निसटशी आघाडी मिळवली होती. दोन्ही संघांतील खेळाडूंनी प्रत्येकी एक लोण चढवताना प्रत्येकी दोन बोनस गुणही वसूल केले. विजयी संघाकडून सचिन पाटीलला सागर खटाडेने सुरेख साथ दिली, तर पराभूत संघाच्या नीलेश तायडे व परेश धाडीने केलेला खेळ एकाकी ठरला.
पुण्याच्याच दोन संघांत झालेल्या महिलांच्या लढतीत सुवर्णयुग स्पोर्टस क्लबने राजमाता जिजाऊ संघाचा 27-18 असा नऊ गुणांनी पराभव केला. त्यात महत्त्वाचा वाटा आंतरराष्ट्रीय खेळाडू दीपिका जोसेफचा होता. तिला किशोरी कोळेकर व सोनाली इंगळेने सुरेख साथ दिली. पूर्वार्धात सुवर्णयुगने एक लोण चढवताना 18-10 अशी आठ गुणांची मिळवलेली आघाडी कायम ठेवत विजय प्राप्त केला. पराभूत संघाच्या स्नेहल शिंदे व सौज्ञानी दुनगुलेने दिलेली लढत अपुरी पडली. दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन बोनस गुण मिळविले. त्याआधी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत सुवर्णयुग स्पोर्टस क्लबने डॉ. शिरोडकर हायस्कूलचा 20-12 असा आठ गुणांनी, तर राजमाता जिजाऊ संघाने मुंबईच्या विरमाता जिजाई संघाचा 36-15 असा 21 गुणांनी पराभव केला.
पुरुष गटातील उपांत्य फेरीच्या लढतीत कोल्हापूरच्या नवभारत शिरोली संघाने नगरच्या सहयोग क्रीडा मंडळाचा 21-12 असा नऊ गुणांनी, तर मुंबईच्या सुनील स्पोर्टस क्लबने सांगलीच्या ईस्लामपूरच्या व्यायामशाळेचा 25-13 असा बारा गुणांनी पराभव केला.
या स्पर्धेत पुरुष व महिला गटात सचिन पाटील (नवभारत संघ) व दीपिका जोसेफ (सुवर्णयुग स्पोर्टस क्लब) यांनी अष्टपैलू खेळाडूचा मान मिळविला, तर "उत्कृष्ट चढाई'साठी नीलेश तायडे (सुनील स्पोर्टस क्लब) व सुजाता काळगावकर (डॉ. शिरोडकर स्पोर्टस क्लब, मुंबई) व "उत्कृष्ट पकडी'साठी अमोल वडार (ईस्लामपूर व्यायामशाळा) व स्नेहल शिंदे (राजमाता जिजाऊ संघ) यांना वैयक्तिक पारितोषिक देण्यात आले.
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ नगरसेवक ऍड. अभय छाजेड, प्रदीप गारटकर यांच्या हस्ते झाला. श्याम दौंडकर, विलास सणस, दिलीप ढवळे, राजेंद्र देशमुख आदी या वेळी उपस्थित होते. अशोक जाधव यांनी प्रास्ताविक, तर संजय नाईक यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश ढमढेरे यांनी आभार मानले.