उपांत्य फेरीचीही खात्री नव्हती - धोनी
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, April 27, 2010 AT 12:00 AM (IST)
नवी मुंबई - खरे तर उपांत्य फेरीतही जाण्याची आम्हाला खात्री नव्हती. स्पर्धेच्या मध्यावर बॅकफूटवर गेलो होतो, गोलंदाजीतही आमची ताकद कमी होती; तरीही यंदाच्या आयपीएल स्पर्धेत आम्ही विजेते ठरलो; त्यामुळे या विजेतेपदाचा आनंद फारच मोठा आहे, असे मत चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने व्यक्त केले. आमची
गुणवत्ता होती त्याच्या 60 ते 70 टक्केच खेळ केल्याचेही त्याने मोकळेपणाने सांगितले.
दोन वर्षांपूर्वी डी. वाय. पाटील मैदानावर धोनीच्या चेन्नई संघाला विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. यंदा मात्र तुलनेने बलाढ्य असलेल्या मुंबई इंडियन्सला पराभूत करून त्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. विजेतेपदानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत धोनी विजेतेपदाच्या आनंदात कोणतेही वास्तव लपवीत नव्हता.
स्पर्धेच्या मध्यावर आम्हाला उपांत्य फेरी गाठता येणार नाही, असे चित्र निर्माण झाले होते; परंतु आमच्या संघाचे मालक एन. श्रीनिवास यांनी संघाची भेट घेतली आणि खेळाडूंना प्रोत्साहित केले. कोणत्याही आव्हानाचा मुकाबला करण्याची क्षमता आमच्यामध्ये असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक खेळाडूंत जागविलेली स्फूर्ती महत्त्वपूर्ण ठरली आणि तेथूनच आमचा खेळ उंचावत गेला, असे धोनीने सांगितले.
स्पर्धेच्या सुरवातीस आमचा भर वेगवान गोलंदाजांवर होता; परंतु बालाजी, त्यागी यांना दुखापत झाल्यामुळे आमच्यासमोर कमी पर्याय होते. परिणामी, आम्ही फिरकी गोलंदाजांवर भर दिला. भारतातील खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजांना साथ देणाऱ्या असल्यामुळे आम्ही या पर्यायाचा विचार केला आणि फिरकीच्या जोरावरच बाजी मारली, असे सांगताना धोनीने ऑफस्पिनर अश्विन, मुरलीधरन आणि शादाब जकाती यांचे कौतुक केले. स्पर्धेच्या मध्यापासून धोनी आपल्या गोलंदाजीची सुरवात अश्विनकडूनच करीत होता. अश्विनची ही गोलंदाजी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यातही निर्णायक ठरली.
पोलार्डची चिंता होती
अंतिम सामन्यात चेन्नई संघाचा विजय जवळपास निश्चित झालेला असताना केरॉन पोलार्डने केलेल्या झंझावाती फलंदाजीमुळे सामन्यात अचानक रंग भरले आणि सामन्याला कलाटणी मिळण्याची चिन्हे दिसू लागली होती. पोलार्ड जोपर्यंत मैदानावर आहे तोपर्यंत मलाही चिंता होती; परंतु त्याला किंवा दुसऱ्या फलंदाजाला बाद करून पुन्हा पकड मिळविण्याची खात्री होती, असे धोनी म्हणाला. पोलार्डला बाद करण्यासाठी धोनीने क्रिकेटच्या पुस्तकात नसलेल्या ठिकाणी (गोलंदाजाच्या रनअपजवळ) क्षेत्ररक्षकाला उभे केले आणि विशेष म्हणजे त्याच क्षेत्ररक्षकाच्या हाती झेल देऊन पोलार्ड बाद झाला. मी तो चान्स घेतला. सर्वसाधारणपणे अशा परिस्थितीत फलंदाज यष्टींच्यासमोर फटके मारण्याचा प्रयत्न करीत असतो आणि पोलार्ड हा हूक करणारा किंवा कट करणारा फलंदाज नसल्यामुळे मी समोर क्षेत्ररक्षक उभा केला. सुदैवाने ही चाल यशस्वी ठरली, असे त्याने सांगितले.
सचिन खेळण्याची खात्री होती
जखमी असतानाही सचिन तेंडुलकर या निर्णायक सामन्यात खेळेल असे वाटले होते का, या प्रश्नावर धोनी म्हणाला, ""सचिन या सामन्यात खेळणार याची मला खात्री होती, त्याची जिद्द मी चांगलीच ओळखतो, छोट्या-मोठ्या दुखापती असताना तो असे अनेक सामने खेळलेला आहे; त्यानुसार तो या सामन्यात खेळणार यात मला तरी शंका नव्हती.''
रॉबिन सिंगकडून समर्थन
पोलार्डला अखेरच्या षटकापर्यंत राखून ठेवण्याची चूक मुंबई इंडियन्सला महागात पडली असल्याचे सिद्ध झालेले असले, तरी मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक रॉबिन सिंग यांनी मात्र या डावपेचांचे समर्थन केले. संपूर्ण स्पर्धेत पोलार्डने अखेरच्या षटकांतच सामन्याला कलाटणी दिलेली आहे. उपांत्य फेरीतही त्याने असाच खेळ केलेला असल्यामुळे आम्ही त्याला राखून ठेवले होते, असे रॉबिन सिंग म्हणाले. 18 चेंडूंत 55 धावांची गरज असताना पोलार्ड आठव्या क्रमांकावर फलंदाजीस आला होता. सुरेश रैनाला दिलेली जीवदाने आम्हाला महागात पडली. त्याचे झेल पकडण्यात आले असते तर चित्र वेगळे दिसले असते, असे त्यांनी सांगितले.