मतदानयंत्र बिघाडामुळे संसदेत गोंधळ
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, April 28, 2010 AT 12:15 AM (IST)
नवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कपातसूचना प्रक्रियेत लोकसभेत मतदान यंत्रणा विस्कळित झाल्याने चांगलाच घोळ झाला. सादर केलेल्या 19 कपातसूचनांवर स्वतंत्ररीत्या मतदान घेतले जावे, यावर विरोधक ठाम होते. मात्र, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेतील बिघाडामुळे अखेर अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांना सर्व कपातसूचनांसाठी एकाचवेळी मतदान घेण्याची विनंती करण्यात आली. विरोधकांनी ती मान्य केल्याने ही प्रक्रिया तासाभरात संपली.
महागाईविरोधात आंदोलन करणाऱ्या लालूप्रसाद, मुलायमसिंह आणि डाव्या पक्षांनी गोंधळ घातल्याने लोकसभेचे कामकाज कपातसूचना व गिलोटीनमुळे सायंकाळी सहाला सुरू झाले. मुलायमसिंह आणि लालूप्रसाद यांनी सभात्यागाचा निर्णय जाहीर केल्याने तेव्हाच कपातसूचनेचे भवितव्य काय असेल, हे निश्चित झाले होते. मात्र, विरोधकांना आणि सरकारला सभागृहात आपली ताकद दाखविण्याची ही संधी होती. त्यामुळे सर्वच विरोधी पक्षांनी कपातसूचनांचा प्रस्ताव दिला होता. विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, माकप नेते वासुदेव आचार्य, शरद यादव, मुरली मनोहर जोशी, अनंत कुमार, शिवसेनेचे अनंत गिते, भर्तृहरी माहताब (बिजू जनता दल), रतनसिंग अजनाला (अकाली दल), प्रबोध पांडा, गुरुदास दासगुप्ता, अर्जुनचरण सेठी, तंबी दुराई, आनंदराव अडसूळ, सुमित्रा महाजन, पी. करुणाकरन, वैजयंत जयपांडा, नित्यानंद प्रधान, सुशांतो मुजुमदार, रामसुंदर दास आदी 19 सदस्यांनी स्वतंत्रपणे कपातसूचना दिल्या होत्या.
विरोधक प्रत्येक कपातसूचनेवर स्वतंत्रपणे मतदान घेण्यासाठी आग्रही होते; तर संसदीय कामकाजमंत्री पवनकुमार बन्सल यांनी गिलोटीनमुळे प्रत्येक सूचनेचा स्वतंत्रपणे विचार करता येणार नसल्याचे सांगितले. मात्र, कपातसूचना प्रस्ताव का ठेवला, याचा खुलासा करणाऱ्या श्रीमती स्वराज यांच्याशी सभागृह नेते प्रणव मुखर्जी यांची शाब्दिक चकमक घडली. सर्वप्रथम कपातसूचना प्रस्तावावर आवाजी मतदान झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक यंत्राद्वारे मतदानाची वेळ येताच सभागृहात वेगळेच वातावरण तयार झाले होते. अर्थात, आवाजी मतदानादरम्यान विरोधकांनी "होय' आणि सत्ताधारी बाकांवरून "नाही'ची घोषणा होताच लोकसभाध्यक्षा मीराकुमार यांनी नेहमीच्या सवयीने "होय'चे बहुमत म्हणताच सभागृहात एकच खसखस पिकली. अर्थात, हे नंतर दुरुस्त करण्यात आले.
दरम्यान, 1946 नंतर पहिल्यांदाच कपातसूचनेसाठी लोकसभेत मतदान पार पडले. मात्र, इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्र बंद पडल्याने 64 वर्षांनंतरही मतदान चिठ्ठ्यांद्वारेच घ्यावे लागले. लोकसभेतील इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्र बंद पडल्याने आयत्यावेळी पंचाईत झाल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवली.
कपातसूचना आवाजी मतदानानंतर मतमोजणीसाठी टाकण्यात आली. त्या वेळी अनेक खासदारांची मते नोंदवली गेलेली नसल्याची तक्रार करण्यात आली. पहिल्यांदा मतदान
झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या बाजूने 246 मते; तर विरोधकांच्या बाजूने 162 मते नोंदविली गेली. दोन सदस्य तटस्थ राहिले होते. मात्र, दुसऱ्या प्रस्तावावर मतदान घेताना सदस्यांनी बटने दाबूनही मतफलकावर आकडे न उमटल्याने एकच गोंधळ झाला. मतदानयंत्रे नादुरुस्त असल्याचे मीराकुमार यांनी जाहीर केले. या घोषणेमुळे सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीत उपस्थित परदेशी शिष्टमंडळाचे चांगलेच मनोरंजन झाले. कपातसूचनेसाठी सभागृहात पहिल्यांदाच मतदान केले जात असल्याने प्रत्येक राजकीय पक्षाचे प्रमुख नेते प्रत्येकाच्या जागेवर जाऊन मतदान कसे करावे, याच्या सूचना देत होते. यात गृह राज्यमंत्री नारायण स्वामी, तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी प्रत्येक खासदाराजवळ जाऊन चोख मतदान करण्यास बजावले. विशेष म्हणजे, ही निर्णायक वेळ साधण्यासाठी सभागृहात आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार पद्मसिंह पाटील, झारखंडचे मुख्यमंत्री असलेले विद्यमान खासदार शिबू सोरेन यांनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
या नादुरुस्त मतदानयंत्रामुळे पवनकुमार बन्सल आणि प्रणवदांनी उर्वरित सर्व प्रस्तावांसाठी एकाचवेळी मतदान घेण्याची सूचना केली. श्रीमती स्वराज यांनी ती मान्य केल्याने मतपत्रिकेंद्वारे मतदान घेण्यात आले. यात सरकारच्या बाजूने 289 मते पडली; तर विरोधकांच्या बाजूने 201 मते पडली. अठ्ठ्याऐंशी मतांच्या फरकाने विरोधकांच्या कपातसूचना फेटाळल्या गेल्या.