राजा यांच्या राजीनाम्याची लोकसभेमध्ये मागणी
सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, May 04, 2010 AT 12:25 AM (IST)
नवी दिल्ली - स्पेक्ट्रमवरून दूरसंचारमंत्री ए. राजा आणि तृणमूल कॉंग्रेसचे राज्यमंत्री शिशिर अधिकारी यांच्या बांगलादेशी शस्त्रास्त्र तस्करांशी संबंध असल्याच्या आरोपावरून आज लोकसभेत जोरदार गोंधळ झाला. अण्णा द्रमुकच्या सदस्यांनी राजा यांच्याविरुद्ध आलेल्या बातम्यांची कात्रणे झळकावून राजीनाम्याची मागणी केली, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने अधिकारी यांच्याबद्दलच्या बातम्यांची कात्रणे दर्शवून जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत थांबविण्यात आले.
राजा प्रकरणात अण्णा द्रमुकच्या सदस्यांनी अध्यक्षांपुढील मोकळ्या जागेत धाव घेऊन राजीनाम्याची मागणी केली. त्यासाठी त्यांनी घोषणाही दिल्या, तसेच बांगलादेशातील शस्त्रास्त्र तस्कराशी तृणमूल कॉंग्रेसचे राज्यमंत्री शिशिर अधिकारी यांचा संबंध असल्याच्या बातम्यांची कात्रणे घेऊन "माकप' खासदारांनीही मोकळ्या जागेत धाव घेतली.
दरम्यान, राज्यसभेतही "माकप'च्या मोईनुल हसन यांनी अधिकारी प्रकरणाचा उल्लेख केला. बांगलादेशीयांकडून घेतलेल्या शस्त्रांचा वापर बॅंक लुटण्यासाठी झाल्याचा आरोप केला. यामुळे गदारोळ झाल्याने राज्यसभेतही कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले होते. दरम्यान, अधिकारी यांनी शस्त्रांच्या सौद्यात आपण मध्यस्थ असल्याच्या बातम्यांचे खंडन केले आहे. "संडे गार्डियन' या इंग्रजी वृत्तपत्रात आलेल्या या बातमीबद्दल धक्का बसल्याचे त्यांनी म्हटले.