Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

युवा मुष्टियुद्ध स्पर्धेत विकासला सुवर्णपदक
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, May 04, 2010 AT 11:45 PM (IST)
Tags: boxing,   pune,   sports

पुणे - भारताच्या मुष्टियोद्‌ध्यांनी आणखी एका स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केली आहे. जागतिक युवा स्पर्धेत हरियानाच्या विकास कृष्णनने सुवर्ण, तर शिवा थापाने रौप्य पटकावले.
अझरबैजानमधील बाकू शहरात ही स्पर्धा होत आहे. विकासने लाईटवेट (60 किलो) गटात ही कामगिरी केली. त्याने लिथुएनियाच्या इव्हालाडोज पेट्रायूस्कास याच्यावर 4-3 अशी मात केली. विकासने गेल्या महिन्यात इराणमध्ये झालेल्या आशियाई युवक स्पर्धेतही विजेतेपद मिळविले होते.

विकासने पहिल्या फेरीत इराणच्या हमीदरेझा रुमियानीला 8-0, दुसऱ्या फेरीत स्लोव्हाकियाच्या पॅट्रिक रॅज्कसानीला 7-0, तिसऱ्या फेरीत लॅट्व्हियाच्या एदुआर्दस गुटमॅन्सला 8-3, उपांत्यपूर्व फेरीत आयर्लंडच्या मायकेल ओरिलेला 8-0, तर उपांत्य फेरीत जर्मनीच्या थॉमस वॅरेनोल्टला 8-0 असे हरविले होते.

अंतिम फेरीत त्याच्यासमोर कडवे आव्हान होते. त्याने पहिल्या फेरीत धूर्तपणे बचावात्मक खेळ करीत 1-1 अशी बरोबरी साधली. दुसऱ्या फेरीत त्याने 3-2 अशी आघाडी घेतली. या वेळी त्याने ताकदवान ठोसे मारले. मग तिसऱ्या फेरीतही 1-1 अशी बरोबरी झाली. विकासने "राइट अप्परकट'नंतर "लेफ्ट हूक' लगावत विजय साकार केला.

शीवाने 54 किलो वजनी गटात रौप्य पटकावले. त्याला क्‍यूबाच्या रबैसी एलॉय रॅमीरेझ कॅरिझोन याने 14-1 असे हरविले. शीवाला सुरवातीच्या फेऱ्यांमध्ये विजयासाठी झगडावे लागले होते, तरीही त्याने हार मानली नाही. मात्र, त्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली. यामुळे कॅरिझोनला फारसे प्रयास पडले नाहीत. त्याने पहिल्या फेरीत 4-0 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत त्याने आणखी चार गुण मिळविले. या फेरीत शीवाने एकमेव गुण मिळविला. त्यात तो आणखी भर घालू शकला नाही.

युवा ऑलिंपिकला पात्र
विकास कृष्णन आणि शिवा थापा यांनी जागतिक युवा स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर युवा ऑलिंपिकमधील सहभाग निश्‍चित केला. सिंगापूरमध्ये येत्या ऑगस्टमध्ये ही स्पर्धा होणार आहे.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: