महापालिकेच्या शाळेतील शिक्षकावर कोयत्याने हल्ला
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, May 11, 2010 AT 12:00 AM (IST)
येरवडा - खराडी येथे महापालिकेच्या शाळेतील एका शिक्षकाला दोन जणांनी रविवारी रात्री कोयत्याने गंभीर जखमी केले. या गुन्ह्यात एकाला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथे सुनील म्हाळसकर (वय 40) यांचे अल्पोपहारगृह आहे. हे अल्पोपहारगृह म्हाळसकर यांचे वृद्ध आईवडील चालवितात. रविवारी सायंकाळी दोन पोलिस कर्मचारी भेळ खाण्यासाठी केंद्रात आले होते. ते भेळ खाऊन गेल्यानंतर आरोपी गौरव शेळके (वय 25) व त्याचा मित्र केंद्रात आले. पोलिसांना काय माहिती दिली,
याबाबत ते म्हाळसकर यांच्याकडे विचारणा करू लागले. मात्र, म्हाळसकर यांनी आपण काहीही माहिती दिली नसल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांनी कोयत्याने डोक्यात मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुर आहेत.
पोलिसांनी रात्री उशिरा शेळकेला अटक केले असून दुसरा आरोपी अद्याप फरारी आहे. म्हाळसकर पुणे महापालिका शिक्षण मंडळाच्या कारागृह वसाहत येथील प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत.