उच्च रक्तदाबाबाबत संतोष अतनूर यांचे संशोधन
-
Friday, May 21, 2010 AT 02:53 PM (IST)
जगातील 25 टक्क्यांपेक्षा जास्त प्रौढ व्यक्तींना हायपरटेन्शन म्हणजेच जुनाट उच्च रक्तदाबासारख्या व्याधीचा त्रास आहे. या व्याधीचे मूळ किंवा मोलिक्युलर बेसीसबाबत फारच अल्प माहिती आहे. माणसांमध्ये असलेल्या या उच्च रक्तदाबाचा अभ्यास करण्यासाठी "स्पॉन्टेनिअसली हायपरटेन्सिव्ह रॅट' (एसएचआर) म्हणजेच तणावाला अधिक संवेदनशीलपणे प्रतिसाद देणाऱ्या उंदराचा जगभरात सर्वाधिक प्रमाणात वापर करण्यात येतो. माणसांमधील उच्च रक्तदाबाच्या जनुकीय कारणांचा थेट अभ्यास करणे अतिशय अवघड असते. त्यामुळे प्रोफेसर टिमोथी ऐटमन यांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञांच्या गटाने "एसएचआर'च्या जनुकांच्या सुत्रबद्ध अभ्यासातून जनुकीय आराखडा तयार केला. त्याचा उपयोग शास्त्रज्ञांना माणसातील उच्च रक्तदाबाची कारणे जाणून घेण्यास होणार आहे.
"डीएनए' संरचना जाणून घेण्यासाठी होणारा खर्च आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. शास्त्रज्ञांनी त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत सस्तन प्राण्यांमधील या व्याधीचे पहिले जनुकीय सूत्र तयार केले.
हे संशोधन ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठ, व्हॅन्क्युव्हर, कॅनडा येथे करण्यात आले. तर त्याचे बायोइन्फॉर्मेटिक्स विश्लेषण लंडनच्या इम्पेरिअल कॉलेजमधील भारतीय संशोधक संतोष अतनूर यांनी प्रोफेसर टिमोथी ऐटमन यांच्या मार्गदर्शनासाठी केले.
"एसएचआर'मधील जनुकीय सूत्र आणि संदर्भासाठी वापरण्यात आलेले जनुकीय सूत्र यांच्या तुलनात्मक अभ्यासातून अतनूर यांनी "एसएचआर'चा परिपूर्ण जनुकीय आराखडा तयार केला, ज्याचा फायदा उच्च रक्तदाब आणि त्याच्याशी संबंधित व्याधींच्या अभ्यासासाठी होणार आहे. याबाबतचा शोधनिबंध "जिनोम रिसर्च' या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झाले असून संतोष अतनूर त्याचे पहिले मानकरी ठरले आहेत.
संतोष अतनूर हे पुणे विद्यापीठातील बायोइन्फॉर्मेटिक्स सेंटरचे माजी विद्यार्थी असून त्यांनी सेंटर ऑफ डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कॉम्प्युटिंग म्हणजेच "सी-डॅक' मध्ये बायोइन्फॉर्मेटिशियन म्हणून पाच वर्षे काम केले आहे.
मूळचे सोलापूरचे असलेले संतोष अतनूर यांचे 12 पर्यंतचे शिक्षण सोलापुरमध्येच झाले आहे. त्यानंतर पुण्यातील कृषि महाविद्यालयातून त्यांनी बी.एससी. ची पदवी प्राप्त केली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीच्या कोकण कृषि विद्यापीठातून त्यांनी जनुकशास्त्र आणि रोपांचे संकर या विषयात एम.एससी. केल्यानंतर 2001-02 मध्ये पुणे विद्यापीठातून अतनूर यांनी "बायोइन्फॉर्मेटिक्स' या विषयात पदव्युत्तर पदविका प्राप्त केली.
जानेवारी 2003मध्ये पुण्यात "सी-डॅक' मध्ये रूजू होण्यापूर्वी त्यांनी पुणे विद्यापीठाच्या बायोइन्फॉर्मेटिक्स सेंटर आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत तीन-तीन महिने काम केले. त्यानंतर जानेवारी 2008मध्ये संतोष अतनूर जगातील पहिल्या पाच नामांकित विद्यापीठा गणाना होणाऱ्या लंडनच्या इंपेरिअल कॉलेजमध्ये बायोइन्फॉर्मेटिशियन म्हणून दाखल झाले.
संतोष अतनूर यांचे वडिल सिदरामप्पा अतनूर हे सोलापूरच्या संगमेश्वर महाविद्यालयाचे कार्यालय अधिक्षक म्हणून निवृत्त झाले असून वीरशैव शिवसंप्रदायक समाजाचे विश्वस्त आहेत.