नागपुरात बीएससीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
सकाळ वृत्तसेवा
Sunday, May 23, 2010 AT 12:00 AM (IST)
नागपूर - शहराच्या जरिपटका भागातील एका विद्यार्थिनीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. शुक्रवारी (ता. 21) रात्री मिसाळ ले-आउट परिसरात ही घटना घडली. परीक्षेदरम्यान पेपर बिघडल्याने तिने आत्महत्या केली असावी, असा कयास आहे.
स्वीटी प्रकाश वसेकर (वय 19) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती सिव्हिल लाइन्स येथील हिस्लॉप महाविद्यालयात बी.एससी. द्वितीय वर्षाला शिकत होती. काल स्वीटीचा "गणित-2' हा पेपर होता. दुपारी पेपर सोडवून आल्यावर तिने जेवण केले. कुटुंबीयांसोबत गप्पाही मारल्या. सायंकाळी जेवण करून पुन्हा आपल्या रूममध्ये झोपण्यासाठी ती गेली. काही वेळानंतर तिला बोलावण्यासाठी मोठ्या भावाने दरवाजा ठोठावला; मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्याने आरडाओरड केली. त्यामुळे घरचे सर्वजण दरवाजा तोडून खोलीत शिरले. त्यांना स्वीटी रूममधील पंख्याला लटकताना दिसली. त्यांनी तिला उपचारार्थ रुग्णालयात नेले; परंतु तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
स्वीटीचे वडील प्रकाश वसेकर बिल्डिंग कॉंट्रॅक्टर आहेत. तिला राहुल, अमोल व सुशील असे तीन भाऊ आहेत. पैकी राहुल कॉम्प्युटर इंजिनिअर आहे. अमोल वडिलांच्या व्यवसायात हातभार लावतो; तर सुशील खासगी कंपनीत नोकरीला आहे.
स्वीटीच्या आत्महत्येमुळे परिसरात कमालीची खळबळ उडाली. ती अभ्यासात अतिशय हुशार होती. शिवाय घरात प्रत्येकाची लाडकी होती. काल पेपरबाबत विचारणा केली असता, तो चांगला गेल्याचे तिने सांगितले होते; मात्र तिने हे पाऊल नेमके कोणत्या कारणावरून उचलले, याबाबत शंका निर्माण झाली आहे. याबाबत पोलिसांना कोणत्याही प्रकारची चिठ्ठी आढळली नसल्याचे कळते. तथापि, प्राथमिक तपासात पेपर बिघडल्यानेच स्वीटीने आत्महत्या केली असल्याचा कयास जरिपटका पोलिसांचा आहे.