भारतास बडतर्फ करण्याचा 'आयओसी'चा इशारा
सकाळ वृत्तसेवा
Sunday, May 23, 2010 AT 12:38 AM (IST)
नवी दिल्ली - केंद्रीय क्रीडा खात्याने भारतीय ऑलिंपिक संघटना आणि क्रीडा महासंघांवर अटी लादल्यास कठोर निर्बंध लादले जातील, असा इशारा आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती तसेच आशियाई ऑलिंपिक परिषदेने शनिवारी दिला.
केंद्रीय क्रीडा खात्याने क्रीडा पदाधिकाऱ्यांच्या कालावधीवर मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला असून, त्यावरून क्रीडा संघटना आणि क्रीडा खात्याच्या पदाधिकाऱ्यांत संघर्ष सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून आमच्या कारभारात हस्तक्षेप केला, तर आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती निर्बंध घालेल, असा इशारा क्रीडा संघटनांचे पदाधिकारी देत होते आणि आता नेमके तसेच घडत आहे.
ऑलिंपिक नियमावलीचा भंग झाल्यास निर्बंध लादले जातील, असे पत्र आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती व आशिया ऑलिंपिक परिषदेने लिहिले आहे. ""केंद्रीय क्रीडा खात्याच्या सूचनांची अंमलबजावणी केल्यास याबाबतचा अहवाल आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या कार्यकारिणीकडे सुपूर्द करण्यात येईल, याची आठवण आम्ही पुन्हा एकदा करून देत आहोत. केंद्रीय क्रीडा खात्याच्या निर्णयास सर्व क्रीडा संघटना, तसेच भारतीय ऑलिंपिक संघटनेने एकमताने विरोध केला आहे, याचीही आम्ही दखल घेतली आहे,'' असे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती व आशियाई ऑलिंपिक परिषदेने एकत्रितपणे पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या महिन्याच्या सुरवातीस केंद्रीय क्रीडा खात्याने सर्व क्रीडा संघटना, तसेच ऑलिंपिक संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या कालावधीवर मर्यादा घातली. भारतातील क्रीडा संघटना, तसेच ऑलिंपिक संघटनेने ही सूचना फेटाळली आहे.
'गतवर्षी कुवेत ऑलिंपिक संघटनेच्या कारभारात सरकार हस्तक्षेप करीत असल्याचे आढळून आले. अर्थातच, त्यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या 28.9 नियमान्वये कुवेत संघटनेस बडतर्फ करण्यात आले. देशातील ऑलिंपिक चळवळीची स्वायत्तता कायम राखणे महत्त्वाचे आहे. त्यात काही हस्तक्षेप केल्यास किंवा ढवळाढवळ केल्यास आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची कार्यकारिणी संबंधित संघटनेस बडतर्फ करू शकते किंवा त्याची संलग्नता रद्द करू शकते. अर्थातच, तुम्ही या प्रश्नावर चर्चा कराल व त्यातून सर्वमान्य तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे.'' असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या आचारसंहितेने भारताची प्रतिमा डागाळली आहे. या प्रकारचा निर्बंधाचा इशारा येणे हीसुद्धा भारतासाठी दुःखद बाब आहे.
- रणधीर सिंग, भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सचिव