अनुत्तीर्ण झाल्याने एसआरपी कॅम्पच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, May 26, 2010 AT 12:00 AM (IST)
नागपूर - हिंगणा मार्गावरील एसआरपी कॅम्पमधील रहिवासी एका विद्यार्थिनीने अनुत्तीर्ण झाल्याच्या कारणावरून घरातच गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. 25) दुपारच्या सुमारास घडली.
बारावीचा निकाल असल्याने अश्विनी ज्ञानेश्वर इंगोले (वय 18) ही घरातून निकालासाठी बाहेर पडली होती. ती नापास झाल्याचे कळताच लगबगीने घरी परतली. तिचे आईवडील मानेवाडा येथील नातेवाइकाचा मृत्यू झाल्याने तिकडे गेलेले होते. घरी कोणीच नसल्याचे निमित्त साधून तिने दोर बांधून गळफास लावून घेतला. शेजारच्यांना शंका आल्याने त्यांनी तिच्या घरात डोकावून बघितले, तेव्हा छताला त्यांना ती लटकलेली दिसली. गळफास काढून तिला शेजाऱ्यांनी लगेचच डिगडोह येथील लता मंगेशकर रुग्णालयात भरती केले व तिच्या आईवडिलांना ही माहिती दिली. अश्विनीचे आईवडील ताबडतोब लता मंगेशकर रुग्णालयात पोचले असता, तिची प्राणज्योत मालवलेली होती. अश्विनी एलएडी महाविद्यालयाची विद्यार्थिनी असल्याचे कळते. या घटनेची नोंद उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिस ठाण्यात झालेली नव्हती.