मेरी कोम, सरिता देवी उपांत्य फेरीत
यूएनआय
Friday, May 28, 2010 AT 12:00 AM (IST)
नवी दिल्ली - भारताची एम. सी. मेरी कोम आणि एल. सरिता देवी यांनी महिलांच्या आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. यासह भारताची किमान दोन ब्रॉंझपदके निश्चित झाली आहेत. कझाकस्तानमधील अस्ताना येथे ही स्पर्धा सुरू आहे.
चार वेळा जगज्जेतेपद पटकाविणाऱ्या मेरी कोमने 46 किलो गटाच्या लढतीत श्रीलंकेच्या अनुष्कावर 6-3 अशी मात केली, तर सरिताने 51 किलो गटाच्या लढतीत उत्तर कोरियाच्या रि हायांग मि हिच्यावर 10-1 अशी मात केली. या दोघींनी आगेकूच केली असतानाच भारताच्या व्हेनलाल ड्युआतीच्या पदरी निराशा पडली. 48 किलो गटाच्या लढतीत ड्युआती आणि चीनच्या ल्यूओ युजी यांच्यात चौथ्या फेरीअखेर 1-1 अशी बरोबरी झाली होती. "काउंटबॅक'मध्येही दोघींची बरोबरी होती. अखेरीस पंचांच्या पाच सदस्यीय पॅनेलने युजीला विजयी घोषित केले.
गेल्यावेळी झालेल्या या स्पर्धेत मेरी कोमला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. या वेळी मात्र तिने सुवर्णयश मिळविण्याचा दृढ निर्धार केला आहे. 27 वर्षीय मेरी कोमने अनुष्काविरुद्धच्या पहिल्या फेरीत 2-0 ने आघाडी घेतली होती. मेरी कोमने ही आघाडी पाहता पाहता तिसऱ्या फेरीअखेर 5-1 ने वाढविली. अखेरच्या चौथ्या फेरीत अनुष्काने प्रतिकार केला. मात्र, त्या वेळी उशीर झाला होता.
विजयानंतर मेरी कोम म्हणाली, ""पहिल्या फेरीपेक्षा अनुष्काविरुद्धची लढत खूपच कठीण होती. मात्र, माझा अनुभव कामी आला. मी परिस्थितीनुरूप खेळ केला. मी आज जरा जास्त आक्रमक खेळ केला. तसेच, प्रतिआक्रमणाद्वारेही गुण मिळविले.''
गेल्या स्पर्धेत सरिताने सुवर्णपदक पटकावले होते. या वेळीही तिने जोरदार सुरवात केली आहे. दुसऱ्या फेरीतील लढतीत तिने मि हिला साफ निष्प्रभ केले. सरिताने तिच्यावर ठोशांची बरसात करीत किमान ब्रॉंझपदक निश्चित केले. गेल्यावेळी गुवाहाटीमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर राहिला होता. त्या वेळी भारताने तीन सुवर्ण आणि दोन रौप्यपदक पटकावले होते.