दूध-ताडी विक्रेत्यांची मुले चमकली 'आयआयटी'त
उज्वल कुमार (ujwal.kumar@esakal.com)
Friday, May 28, 2010 AT 12:15 AM (IST)
पाटणा - तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या "आयआयटी'च्या प्रवेश परीक्षेत बिहारमधील गरीब विद्यार्थ्यांनी पुन्हा आपल्या गुणवत्तेची मोहर उमटवली आहे. दूध आणि ताडी विकणाऱ्यांच्या मुलांनी या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. गया जिल्ह्यातील पटवाटोली येथील विणकर समाजातील सात मुले या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहेत.
पटवाटोली गावाचे नाव राज्यातच नव्हे, तर देशात अभिमानाने घेतले जात आहे. तेथील विणकरांच्या वस्तीचा "आयआयटी' घडविणारी भूमी असा नावलौकिक झाला आहे. गेल्या वर्षी याच वस्तीतील पाच विद्यार्थी "आयआयटी' प्रवेश परीक्षेत चमकले होते. दहा वर्षांत या वस्तीमधील पन्नासपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी "आयआयटी'तून शिक्षण पूर्ण करून ते देश-विदेशात विविध ठिकाणी मोठ्या पदावर कार्यरत आहेत.
यंदा उत्तीर्ण झालेले सातही विद्यार्थी मागासवर्गीय समाजातील आहेत. विशेष म्हणजे ते सगळे "आयआयटी'चा एकत्रित अभ्यास करीत होते. या वस्तीतील "आयआयटी' झालेले विद्यार्थी त्यांना तेथे येऊन मार्गदर्शन करीत होते. या परीक्षेत यशस्वी होण्याच्या अनेक "टिप्स' त्यांनी आपल्या नव्या विद्यार्थ्यांना दिल्या होत्या.
कमलेश यादव याने या परीक्षेत 7,879 वा क्रमांक मिळविला. कमलेशच्या वडिलांनी त्याला दूध विकून शिकविले, ही निश्चितच उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल. आता वडिलांच्या कष्टाला फळ आल्याचे दिसत आहे. कमलेश इंजिनिअर होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. राज्यातील हे एकमेव उदाहरण नाही. या परीक्षेत यशस्वी झालेल्या एक डझनपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी कोणताही शिकवणी वर्ग लावलेला नव्हता. "आयआयटी'ची प्रवेश परीक्षा देताना शिकवणी वर्ग लावणे गरजेचे असते, असा सर्वत्र बोलबाला आहे. मात्र, या गरीब आणि छोट्या गावातील विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर कमावलेले यश या समजाला छेद देणारे ठरले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यातील सातशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी "आयआयटी'च्या परीक्षेत यश मिळविलेले आहे. राज्यातील गौरव अग्रवाल याने गुणवत्ता यादीत तेविसावा क्रमांक मिळविलेला आहे. दुसरीकडे, राज्यातील गरीब विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या "सुपर-30' या संस्थेचे सर्व विद्यार्थी यंदा यशस्वी झाले आहेत. या संस्थेचे अध्यक्ष आनंदकुमार यांनी पुढील वर्षी साठ विद्यार्थ्यांकडून "आयआयटी'ची तयारी करून घेतली जाणार असल्याचे सांगितले.