
कोलकता - पश्चिम बंगालमधील पश्चिम मिदनापूर जिल्ह्यात माओवाद्यांनी झाराग्रामजवळ रेल्वे रुळांवर घडविलेल्या स्फोटांमुळे झालेल्या रेल्वे दुर्घटनेत आज 71 प्रवासी ठार झाले. या दुर्घटनेत सुमारे दीडशे प्रवासी जखमी झाले आहेत. हावड्याहून मुंबईतील कुर्ला स्थानकाकडे निघालेल्या ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसला (2102) गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास खेमासोली आणि सर्दिया रेल्वेस्थानकांदरम्यान हा अपघात झाला.
झाराग्रामजवळ माओवाद्यांनी रेल्वे रुळांवर घडवून आणलेल्या स्फोटांमुळे भरधाव वेगात असलेल्या ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसचे 13 डबे घसरले. त्याचवेळी यातील पाच डबे शेजारून विरुद्ध दिशेने येत असलेल्या मालगाडीला जाऊन धडकले. यामुळे मोठी दुर्घटना घडली. रेल्वेच्या बचाव पथकाने गॅस कटरच्या साहाय्याने रेल्वेचे डबे कापून प्रवाशांचे अडकलेले मृतदेह बाहेर काढले. या डब्यांतून जखमी प्रवाशांनाही बाहेर काढण्यात आले असून, त्यांना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.
दुर्घटनास्थळावरील रेल्वे रुळांच्या "फिश फ्लेट्स' काढण्यात आल्या असून, सुमारे दीड मीटरचा रेल्वे रूळ गायब असल्याचे पोलिसांना प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) सुरोजित करपुरोकायस्थ यांनी येथे दिली. घटनास्थळावर पीपल्स कमिटी अगेन्स्ट पोलिस ऍट्रोसिटीज (पीसीटीए) या माओवाद्यांच्या संघटनेची दोन पत्रके आढळून आल्याची माहिती राज्याचे गृह सचिव समीर घोष यांनी दिली आहे. बचाव पथकाला 71 मृतदेह मिळाले असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
रेल्वे घसरण्यापूर्वी चालकाने स्फोटाचा मोठा आवाज ऐकला असल्याचे रेल्वे वाहतूक मंडळाचे सदस्य विवेक सहाय यांनी सांगितले. माओवाद्यांविरुद्धच्या मोहिमेसाठी या भागात तैनात असलेले केंद्रीय राज्य राखीव दल (सीआरपीएफ) आणि कोब्रा तुकड्यांचे सुमारे पाचशे जवान बचाव कार्यासाठी रात्री दोनच्या सुमारास सर्वप्रथम घटनास्थळावर पोचले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यासाठी हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. माओवाद्यांनी नागरिकांवर केलेला हा या महिन्यातला दुसरा मोठा हल्ला आहे. या अगोदर दंतेवाडा जिल्ह्यात 17 मेस माओवाद्यांनी भूसुरुंगांच्या साहाय्याने बस उडवून दिल्याने "सीआरपीएफ'च्या 12 जवानांसह 36 जण ठार झाले होते.
माओवाद्यांनी अचूकवेळी बॉंबस्फोट घडविल्याने "ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस' रुळांवरून घसरून मालगाडीला घासली गेल्याचे रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर सांगितले. पश्चिम मिदनापूर भागात माओवाद्यांनी काळा आठवडा पाळला असल्याने या घटनेमागे त्यांचाच हात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. मृत प्रवाशांच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणाही बॅनर्जी यांनी केली.
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी माओवादी हल्ल्यांत मृत्युमुखी पावलेल्यांच्या नातेवाइकांसाठी दोन लाख रुपये, तर जखमींना पन्नास हजार रुपयांचे अर्थसाहाय्य जाहीर केले आहे. या हल्ल्यात सापडलेल्या कुटुंबांपर्यंत सर्व मदत पोचविण्याचा आदेश त्यांनी रेल्वे व अन्य खात्यांना दिला आहे.
"माओवादी समाजाविरुद्ध लढत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यांनी निष्पाप प्रवाशांवर आज भेकड हल्ला घडवून आणला आहे. माओवाद्यांविरुद्धची मोहीम आणखी तीव्र करण्यात येईल.''
-
मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्यमाओवाद्यांचे रेल्वेवरील हल्ले- ऑक्टो. 2009 - भुवनेश्वर -दिल्ली राजधानी एक्स्प्रेस आठ तास ओलिस.
- नोव्हे. 2009- झारखंडमधील सिमेदगा जिल्ह्यात लोहमार्ग उडविला, दोन ठार, 38 जखमी
- 19 मे 2010 - प. बंगालमधील झाराग्राममध्ये लोहमार्गावर भूसुरुंगाचा स्फोट, मालगाडीचे इंजिन उद्ध्वस्त, दोन्ही चालक गंभीर जखमी.
- 20 मे 2010 - बिहारमध्ये दिगवारा लोहमार्गावर लावलेल्या आगीत तेलवाहू रेल्वेचे 14 टॅंकर भस्मसात.
- 22 मे 2010 - पश्चिम मिदनापूर जिल्ह्यात बन्सताला स्टेशनवर चकमकीत दोन प्रवासी जखमी.