भाजपतर्फे राज्यसभेसाठी पीयूष गोयल
सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, May 29, 2010 AT 12:15 AM (IST)
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाच्या आज रात्री झालेल्या बैठकीत राज्यसभेसाठी महाराष्ट्रारातून अपेक्षेप्रमाणे पीयूष गोयल यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली, तसेच विधान परिषदेसाठी माजी मंत्री शोभा फडणवीस, लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे व नाशिक पदवीधर मतदारसंघातून सुहास फरांदे यांना उमेदवारी देण्याचा निर्णयही करण्यात आला. मात्र, राज्यसभेसाठी मध्य प्रदेश व राजस्थानमधील उमेदवार निश्चित करणे पक्षाला आज शक्य झाले नाही. राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत येत्या 31 मेपर्यंत (सोमवार) आहे.
भाजप संसदीय मंडळाची बैठक पक्षनेते लालकृष्ण अडवानी व पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या मुख्य उपस्थितीत आज येथे अशोक रस्त्यावरील भाजप मुख्यालयात झाली. राज्यसभेसाठी राज्यातून पक्षाचे नवे खजिनदार असलेले गोयल यांचे नाव आधीपासूनच निश्चित झाले होते. त्यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले, तसेच विधान परिषदेसाठी फडणवीस यांच्यासह मुंडे व फरांदे यांची उमेदवारीही निश्चित झाली. मुंडे यांना यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिली होती. मात्र, ते पराभूत झाले होते. पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी मिळालेले सुहास फरांदे हे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आहेत. दिवंगत नेते ना. स. फरांदे यांचे ते पुतणे, तर नाशिकच्या उपमहापौर देवयानी फरांदे यांचे ते पती आहेत. युवा मोर्चापासून काम सुरू केलेले फरांदे 1992 ते 1995 या काळात नाशिक महापालिकेचे नगरसेवक होते.
राज्यसभेसाठी भाजपतर्फे नव्या चेहऱ्यांना संधी देण्याऐवजी जुन्यांनाच पुन्हा पाठविणार अशी चिन्हे होती. कर्नाटकातून ज्येष्ठ नेते वेंकय्या नायडू, उत्तर प्रदेशातून उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी, बिहारमधून पक्षप्रवक्ते राजीवप्रताप रूडी व छत्तीसगडमधूनही राज्यसभेवर असणारे नंदकुमार साई यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. नव्या नावांमध्ये गोयल यांच्या व्यतिरिक्त कर्नाटकातून ए. मंजुनाथ हे एकमेव नाव आजच्या यादीत आहे. मध्य प्रदेशासह राजस्थानातील तिढा सोडविण्यात संसदीय मंडळाला आज यश आलेले नाही. तेथे ज्येष्ठ नेत्या नजमा हेपतुल्ला यांच्यासह अभिनेत्री हेमामालिनी, मावळते खासदार अनिल दवे, तसेच वसुंधराराजे यांचा गटही आग्रही असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे तेथील निर्णय आगामी दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे.
विधान परिषदांसाठीचे उमेदवार असे (कंसात राज्यांची नावे) ः हुरदय नारायण दीक्षित (उत्तर प्रदेश), हरेंद्र प्रताप सिंह (बिहार), सी. एच. विजयशंकर, नारायण हांगडी, व्ही. कोमप्पा व अश्वथ्थ नारायण (सर्व कर्नाटक).