Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

राष्ट्रवादीला शह देण्याची कॉंग्रेसची खेळी
सकाळ वृत्तसेवा
Monday, May 31, 2010 AT 12:00 AM (IST)

मुंबई  -  कॉंग्रेसअंतर्गत वाढता दबाव आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची कोंडी करण्यासाठी कॉंग्रेसने विधान परिषदेसाठी चौथा व राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार रिंगणात उतरविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, असे समजते. विधान परिषदेच्या चौथ्या उमेदवारीसाठी माजी आमदार कन्हयालाल गिडवानी, मुख्यमंत्रीसमर्थक अमर राजूरकर, आशीष कुलकर्णी, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांचे समर्थक बाळासाहेब शिवरकर, गुलाबराव घोरपडे, महसूलमंत्री नारायण राणे यांचे समर्थक रवींद्र फाटक, श्‍याम सावंत यांच्या नावांची चर्चा आहे.

राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीत आघाडीच्या वाटाघाटीत कॉंग्रेसने आपल्या चौथ्या उमेदवाराला राष्ट्रवादीने त्यांची अतिरिक्त मते द्यावीत, त्या बदल्यात त्यांच्या राज्यसभेच्या दुसऱ्या उमेदवाराला आमची जादा मते देऊ, असा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, हा प्रस्ताव धुडकावून राष्ट्रवादीने राज्यसभेसाठी दोन व विधान परिषदेसाठी तीन उमेदवार जाहीर केले. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. त्यातच चौथा उमेदवार उभा करण्यासाठी पक्षांतर्गतच एकमेकांना शह-काटशह देण्याचे राजकारण खेळले जात आहे. त्यामुळे विधान परिषदेसाठी चौथा व राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार उभा करण्याच्या हालचाली सुरू आहेत. चौथ्या उमेदवाराची मुख्यमंत्र्यांवर जबाबदारी टाकली, तर त्यांचे समर्थक अमर राजूरकर किंवा आशीष कुलकर्णी यांपैकी एकाला संधी मिळण्याची शक्‍यता आहे. चौथ्या उमेदवारासाठी आग्रह धरणारे विलासराव देशमुख यांच्यावर ती जबाबदारी टाकली, तर गुलाबराव घोरपडे किंवा बाळासाहेब शिवरकर यांपैकी एकाचे नाव नक्की होण्याची शक्‍यता आहे. नारायण राणे यांच्या कोर्टात बॉल टाकला, तर त्यांचे खंदे समर्थक रवींद्र फाटक किंवा श्‍याम सावंत यांच्यापैकी एकाचा विचार होऊ शकतो.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्यसभेची तिसरी आणि विधान परिषदेची चौथी जागा लढविण्यासाठी आग्रही असणारे कन्हयालाल गिडवानी यांचेही नाव आघाडीवर आहे. त्यांनी आज दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल व राज्याचे प्रभारी ए. के. अँटनी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे थेट उमेदवारी मिळण्यासाठी विनंती केल्याचे समजते. विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची उद्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे चौथ्या उमेदवाराबाबत रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी निर्णय होण्याची शक्‍यता आहे.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: