Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

मेरी कोम, सरिताला सुवर्ण
वृत्तसंस्था
Monday, May 31, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: mery kom,   l sarita,   boxing,   sports
नवी दिल्ली - भारताच्या एम. सी. मेरी कोम आणि एल. सरिता देवी यांनी महिलांच्या आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. आशियाई स्पर्धेतील मेरी कोमचे हे तिसरे, तर सरिताचे हे चौथे सुवर्ण ठरले आहे. या सुवर्णयशासह भारताने स्पर्धेत एक रौप्य आणि पाच ब्रॉंझपदकेही पटकावली. ही स्पर्धा कझाकस्तानच्या अस्ताना येथे झाली. या स्पर्धेत भारत चौथ्या स्थानावर राहिला.

भारताच्या तीन खेळाडूंनी अंतिम फेरी गाठली होती. त्यात मेरी कोम आणि सरिता यांनी सुवर्णयश संपादन केले. मात्र, 81 किलो गटाच्या अंतिम लढतीत अस्वाती मोलला पराभूत झाली. त्यामुळे तिला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.

गतवेळेस गुवाहाटीत झालेल्या या स्पर्धेत मेरी कोमला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले होते. चार वेळा जगज्जेतेपद पटकाविणाऱ्या मेरी कोमने या वेळी सुवर्णयश मिळविण्याचा दृढ निश्‍चय केला होता. 46 किलो किलो गटाच्या अंतिम लढतीत मेरी कोमने कोरियाच्या जॉंग ओके हिचा 8-1 असा पराभव केला. पहिल्या फेरीत मेरी कोमने 2-1 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर पुढील तीनही फेऱ्यांत मेरी कोमने ओकेला गुण नोंदविण्याची एकही संधी दिली नाही.

खेलरत्न पुरस्कार विजेती मेरी कोम म्हणाली, ""अपेक्षेपेक्षा सोपी लढत झाली. खरे सांगायचे झाले तर उपांत्य लढतीत मला पुढे चाल मिळाली होती. त्यामुळे मी पूर्णतः ताजीतवानी होते. त्यामुळे रिंगमध्ये विजयासाठी फारसे प्रयास पडले नाहीत. आम्ही चौथ्यांदा आमनेसामने आलो होतो. तिच्यावरील माझा हा तिसरा विजय ठरला आहे.''

या स्पर्धेच्या 51 किलो गटात भारताच्या सरिताने मंगोलियाच्या मियागमार्दुलन हिच्यावर 16-5 असा विजय नोंदविला आणि विजेतेपद निश्‍चित केले. अर्जुन पुरस्कार विजेती सरिता म्हणाली,

"अंतिम लढतीपेक्षा उपांत्यपूर्व आणि उपांत्य लढत जास्त "टफ' होत्या. हे यश निश्‍चितच आत्मविश्‍वास उंचावणारे आहे.''
या स्पर्धेच्या 81 किलो गटातील अंतिम लढतीत चीनच्या वांग यानराइ हिने भारताच्या अस्वाती मोल हिच्यावर 5-0 अशी मात केली. त्यामुळे अस्वातीला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.

दरम्यान, भारताच्या प्रियांका चौधरी, पवित्रा, कविता जी., सोनम यादव, कविता चाहल यांना ब्रॉंझपदकावरच समाधान मानावे लागले. 54 किलो गटाच्या उपांत्य लढतीत कझाकस्तानच्या शेकरबेकोवा जयाना हिने प्रियांका चौधरीचा 11-4 असा, 57 किलो गटात कोरियाच्या युन कुम ज्यू हिने पवित्राचा 12-3 असा, 60 किलो गटात चीनच्या यांग टिंग टिंग हिने कविता जी. हिचा 4-1 असा, कझाकस्तानच्या शाकीमोवा डॅरीगाने सोनम यादवचा 10-0 असा, तर चीनच्या लीन युन फेइ हिने कविता चाहल हिचा 12-2 असा पराभव केला.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: