पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी मोसमी पावसाची आवश्यकता
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, June 02, 2010 AT 12:00 AM (IST)
पुणे - पूर्वमोसमी पाऊस सुरू झाला असला, तरी धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी मोसमी पाऊस लवकर सुरू होण्याची आवश्यकता आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या मुठा खोऱ्यातील चार धरणांतील एकत्रित पाणीसाठा गेल्या वर्षीपेक्षा थोडा कमी झाला आहे.
चारही धरणांमध्ये मंगळवारी 2.43 टीएमसी (8.69 टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी एक जूनला 2.46 टीएमसी (8.81 टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता. वरसगाव धरणामध्ये 1.05 टीएमसी (8.20 टक्के), पानशेत धरणात 1.18 टीएमसी (11.11 टक्के), खडकवासला 0.19 टीएमसी (9.71 टक्के) पाणीसाठा आहे. टेमघरमध्ये उपयुक्त पाणीसाठा नाही.
गेल्या वर्षी पावसाला उशिरा प्रारंभ झाला होता. पंधरा जूनपर्यंत पावसाची चिन्हे न दिसल्याने चलबिचल सुरू झाली होती. वीस जूनपासून 20 टक्के पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला, तर त्यानंतर ते प्रमाण तीस टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले होते. पाऊस नसल्याने त्या काळात शेतीसाठीही पाण्याची मागणी वाढली होती. जुलैमध्ये पाऊस सुरू झाला होता.
पुणे व परिसरात सोमवारी व मंगळवारी चांगला पाऊस झाला. कालव्याद्वारे पाणी पुरविले जात असलेल्या शेतीच्या परिसरात हा पाऊस झाला असल्यास कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी कमी होण्याची शक्यता आहे.
सध्या धरणात असलेला पाणीसाठा पुणे शहराला 15 जुलैपर्यंत पुरेल एवढा आहे. त्यामुळे मोसमी पाऊस जूनमध्ये चांगला पडल्यास पुण्याला यंदा पाणीटंचाई भेडसावणार नाही.