पाच एकर बागायती सोडून पाण्यासाठी दिली जागा...!
सकाळ वृत्तसेवा
Thursday, June 03, 2010 AT 12:30 AM (IST)
धुळे - वलवाडीच्या नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून स्वमालकीच्या शेतातील पाच एकराची बागायती जागा सोडून देत शेतकरी भगवान व छगन नथ्थू चौधरी यांनी विहिरीसह आनुषंगिक सुविधेसाठी पुढाकाराने मोफत जागा दिली. त्यांची ही बांधिलकी, दानशूरतेची भूमिका इतरांसाठी प्रेरणादायी, आदर्शवत ठरली आहे. दरम्यान, या विहिरीतून वलवाडीसाठी पाणीपुरवठा सुरू झाला असून यानिमित्त माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी महापौर भगवान करनकाळ यांनी याठिकाणी आज जलपूजन केले.
वलवाडी गावासह परिसरात कॉलनींचा वाढता विस्तार आहे. या ग्रामपंचायतीअंतर्गत शासकीय नोंदीनुसार लोकसंख्या 17 ते 18 हजार असली, तरी प्रत्यक्षात ती 24 ते 25 हजार आहे. साहजिकच सुविधांवर ताण वाढला आहे. पाणीपुरवठा व्यवस्थेवरही ताण येत आहे. पाण्याचा तुटवडा भासत असल्याने या भागात टंचाईची स्थिती निर्माण झाली. काही भागात विलंबाने पाणीपुरवठा होत होता. नागरिकांचे हाल होत होते. यातून मार्ग काढावा यासाठी ग्रामपंचातीसह पंचायत समिती सदस्यांनी माजी आमदार तथा जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, माजी महापौर भगवान करनकाळ यांना साकडे घातले.
योजना आली आकारास
या पार्श्वभूमीवर हरण्यामाळचे पाणी नकाणे तलावात व नकाणे गाव परिसरातून एका विहिरीद्वारे पाणी वलवाडी गावापर्यंत नेण्याची योजना हाती घेण्यात आली. माजी आमदार कदमबांडे यांनी महापालिकेच्या साहाय्याने ही योजना आकारास आणली. चारीव्दारे, तसेच विहिरीद्वारे तलावातील पाणी वलवाडी येथे जलवाहिनीव्दारे नेले जात आहे. याकामी वलवाडी येथे राहणारे शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते भगवान नथ्थू चौधरी, छगन नथ्थू चौधरी यांनीही आदर्शवत पुढाकार नोंदवला. त्यांनी नकाणे गाव परिसरात असलेल्या स्वमालकीच्या शेतातील पाच एकराची बागायती जागा विहिरीसह आनुषंगिक सुविधेसाठी देऊन टाकली. वलवाडीकरांना पिण्याचे पाणी मिळावे, त्यांचे हाल थांबावेत, यासाठी शेतकरी चौधरी बंधूंनी कसायचे पाच एकर बागायती शेती क्षेत्र कमी करून, ही जागा गावासाठी मोफत देऊन हा प्रश्न सोडविण्यासाठी मदत केली आहे. श्री. कदमबांडे, श्री. करनकाळ व शेतकरी चौधरी बंधूंच्या प्रयत्नातून आज तलावातील पाणी विविध सुविधांच्या निर्मितीमुळे वलवाडीला पोहोचले आहे.
विशेष सहकार्याने लाभ
या पार्श्वभूमीवर माजी आमदार कदमबांडे, माजी महापौर भगवान करनकाळ, वलवाडीचे सरपंच भटू संतोष चौधरी, पंचायत समिती सदस्य छोटू चौधरी, माजी सरपंच संतोष चौधरी, बापू मोहन पाटील, कुणाल पाटील, भगवान चौधरी, छगन चौधरी, नरेश चौधरी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी श्री. कदमबांडे व श्री. करनकाळ यांच्या हस्ते विहिरीलगत आज दुपारी जलपूजन झाले. श्री. कदमबांडे, श्री. करनकाळ, शेतकरी चौधरी, महापालिकेच्या विशेष सहकार्यामुळे वलवाडीच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला, असे सरपंच भटू चौधरी यांनी "सकाळ'ला सांगितले.
पाण्याचे नियोजन झाले
वलवाडी गावासह परिसरातील विस्तारित कॉलनींसाठी रोज सुमारे 15 ते 16 लाख लिटर पाणी लागते. आता या योजनेमुळे दिवसाला रोज चार ते पाच लाखांवर लिटर पाणी उपलब्ध होऊन पाणीपुरवठा करता येईल. तूर्त दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असून व्यवस्था सुरळीत झाल्यावर नियमितपणे पाणी देण्यासाठी प्रयत्न होतील, असे सरपंच चौधरी यांनी नमूद केले.