हरियाणात पोलिसाने केला महिलेचा विनयभंग
पीटीआय
Wednesday, June 09, 2010 AT 04:31 PM (IST)
यमुनानगर (हरियाना) - हरियानाचे माजी पोलिस महासंचालक एस.पी.एस. राठोड यांच्यापाठोपाठ आणखी एक निवृत्त पोलिस अधिकारी एम. एस. अहलावत यांच्याविरुद्ध महिला वकिलाचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
अहलावत हे पोलिस महानिरीक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. ते यमुनानगर येथे पोलिस अधीक्षक असताना 2002 मध्ये हा प्रकार घडलेला होता. विशेष म्हणजे घटना घडली तेव्हा राठोड हेच राज्याचे पोलिस महासंचालक होते. तब्बल आठ वर्षांनंतर गुन्ह्याची नोंद झाली आहे. ""आतापर्यंत प्रयत्न करूनही पोलिस गुन्हा दाखल करून घेत नव्हते. शेवटी उपोषण केल्यानंतर आणि सध्याचे महासंचालक रंजीव सिंग दलाल यांची भेट घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,'' असे अरविंदर कौर यांनी सांगितले.
"माझ्या पतीविरुद्ध हुंड्याची तक्रार करण्यासाठी मी अहलावत यांच्याकडे गेले होते. त्यांनी मला त्यांच्या कॅंप येथील कार्यालयात भेटायला बोलावले. त्या वेळी माझा विनयभंग करून अनैतिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता,'' असा आरोप करून त्या म्हणाल्या, ""त्या वेळी राठोड हे महासंचालक नसते तर विनयभंग करण्यास अहलावत धजावले नसते. जिथे विनयभंगाच्या आरोपानंतरही महासंचालकांवर (राठोड) कोणतीच कारवाई होत नाही, तिथे कनिष्ठ अधिकारी अशाच प्रकारचे कृत्य करण्यास अजिबात घाबरणार नाहीत.''
अहलावत यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानातील 354, 323 आणि 506 कलमे लावण्यात आली आहेत. या घटनेचा तपास करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून अहवाल लवकरच मिळेल, अशी माहिती पोलिस अधीक्षक सिबाश काबिराज यांनी दिली.
रुचिका गिऱ्होत्रा या उगवत्या टेनिसपटूचा विनयभंग आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राठोड यांना नुकतीच 18 महिन्यांची शिक्षा झाली आहे. प्रारंभी त्यांना फक्त सहा महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली होती.