Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

विश्‍वव्यापी 'आई'पण...
डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे, पुणे
Monday, June 14, 2010 AT 02:14 PM (IST)
मला वाटते, प्रत्येक स्त्री आईच असते. ती आईपण घेऊनच जन्माला येते. हे "आई'पण स्वतःच्या मुलांपर्यंत मर्यादित नसते, तर सर्वच गोष्टी तिच्या मायेच्या पदराखाली असतात. "आई'पण सर्वव्यापी असते.

"मदर्स डे' वगैरे संकल्पना आपल्याकडेही रुजू पाहत आहेत. त्या निमित्ताने वर्तमानपत्रांतून खूप काही भरभरून लिहून आले. विविध वाहिन्यांवर त्यावर भावनिक कार्यक्रम झाले. जन्मदा आई, अनाथांची आई झालेली कुणी कार्यकर्ती अशा विविध प्रकारच्या मातृत्वाचे गोडवे गायले गेले. जन्मदात्री - पालनकर्ती मोठी आहे याबद्दल वादच नाही; पण या सगळ्यात सर्वांच्या काही आयांना आपण विसरलो असे नाही वाटत?

आपली सर्वांत मोठी आई आपली मातृभूमी. तिच्यावर थुंकताना, मलमूत्र विसर्जन करताना ती आपली आई आहे, हे आपण कसे विसरतो? सरस्वती विद्येची देवी ती ही आईच. तिची खरेदी-विक्री करताना आपले मन जराही कचरत नाही. या व्यापाराची रूढी करून शिक्षणसम्राट या देशात कोणती परंपरा सुरू करीत आहेत आणि पालक त्याला खतपाणी घालत आहेत? लक्ष्मी आईसाठी त्याच आईच्या लेकरांची कत्तल करताना आपले हात जराही कचरत नाहीत - मग ते गुप्तधनासाठी नरबळी असोत, हुंडाबळी किंवा खून, दरोडे!
तुमची-माझी सख्खी आई - देवत्व देत गोडवे गायची आपली संस्कृती. पण पहिली सरसकट तोंडात असणारी शिवी असते आईवरूनच! अभ्यास करता असे लक्षात येते, की आपल्या भाषेत सगळ्यात गलिच्छ शिव्या बाईवरून - आईवरून असतात. अशी आपली दुटप्पी वर्तणूक.

अनेक घरांमधून आईवर अत्याचार होत असतात. घरातील व्यसनी पुरुषाकडून, सासूकडून, नणंदेकडून. आई ते स्त्रीत्वाचा शाप म्हणून सहन करीत असते. पण मुलेही बघ्याचीच भूमिका घेतात. आईला वाचविण्याचा प्रयत्न का नसावा? कोणत्या अधिकाराने आपण आईचे, मातृभूमीचे, विद्येच्या आईचे, लक्ष्मीमातेचे गोडवे गातो? हा दुटप्पीपणा संपेल त्या दिवशी खरा मातृदिन साजरा होईल.

आपण आईबद्दल दुटप्पी धोरण अवलंबतो. पण आईला आपले आईपण कसे दिसते किंवा भारतीय आईची नेमकी संकल्पना काय, हे पाहणेसुद्धा एक वेगळा अनुभव ठरू शकतो.
एका पाश्‍चिमात्य समाजशास्त्रज्ञाने लिहिल्याचे वाचनात आले, की पश्‍चिमेकडच्या देशांत बाई ही प्रथम पत्नी असते आणि मग माता, तर पूर्वेकडच्या देशांमधून ती प्रथम माता असते मग सर्व काही. हे आईपण म्हणजे नेमके काय? गर्भधारणेची क्षमता असणे, मुलाला जन्म देणे, त्याचे संगोपन करणे याला आईपण म्हणायचे की आणखी काही?

"आई' या संकल्पनेबद्दल भारतीय मनात फार उदात्त, तसेच हळुवार भावना असतात. पण स्वतः भारतीय स्त्री स्वतःचे आईपण कसे पाहते? मुलाला जन्म देऊनच आईपण येते, का प्रत्येक स्त्रीमध्ये एक वात्सल्यमूर्ती दडलेली असते? मला असे वाटते, की प्रत्येक स्त्री ही आईच असते - ती आईपण घेऊनच जन्माला येते, असे म्हटले तर या देशात तरी चूक ठरू नये. हे आईपण स्वतःच्या मुलांपर्यंत मर्यादित नसते. घरातील लहानथोर सर्व व्यक्ती, पाळीव जनावरे एवढेच काय, तर घर, घराचे वासे, घरातील छोट्या-मोठ्या गोष्टी सर्व तिच्या मायेच्या पदराखाली असतात. त्यात तिची भावनिक गुंतवणूक असते. घरातील एखादा छोटासा चमचा जरी हरवला, मोडला तर घरातील पुरुष म्हणतो, "आणू दुसरा.' पण बाई त्या चमच्यासाठी पुटपुटतच राहते. तो कधी घेतला, कसा वापरला सर्व आठवत राहते. तितक्‍याच आत्मीयतेने जितके आपल्या मुलांबाबत. असे हे सर्वव्यापी आईपण.

काही वर्षांपूर्वी माझ्या पीएच.डी.च्या अभ्यासप्रकल्पासाठी मी याच गोष्टीचा मागोवा घेण्याचे ठरविले. प्रौढशिक्षण क्षेत्रात काम करीत असता स्त्रियांमधील निरक्षरता आणि त्यांचा प्रौढशिक्षण उपक्रम स्वीकारण्यास नकार हा सर्वदूर प्रश्‍न दिसत होता. अपेक्षित प्रौढ शिक्षण तरी काय होते? पाठ्यक्रमात होते आरोग्य - आहार शिक्षण, कायदा व रोजचे जीवन सुकर करण्यास लागणारी माहिती व त्याबरोबर अक्षरओळख. मी असे ठरवले, की बाईतल्या आईला हात घातला, की ती काहीही करायला तयार होते, तर शिक्षणासाठी का होणार नाही? मग काही ग्रामीण, काही आदिवासी, काही शहरी केंद्रे निवडून प्रयोग सुरू केला.

प्रौढशिक्षण न म्हणता त्याला मातृकलेचे नाव दिले. विषय तेच - पाठ्यक्रम मूळचाच. पण मुलांसाठी, घरासाठी, शेतीसाठी असे परवलीचे शब्द वापरल्यावर त्यात महिलांना रस वाटू लागला व आनंदाने त्या शिकू लागल्या. प्रयोग जवळजवळ शंभर टक्के यशस्वी झाला.

आजही मी वंचित महिला-मुलांच्यात काम करते. महिला शिक्षणाच्या कोणत्याही उपक्रमाला महिलांचा प्रतिसाद काही फारसा बरा नसतो. महिला बैठकीला यायला कंटाळा करणाऱ्या बायका, मुलांसाठी अमुकतमुक म्हटल्यावर वेळात वेळ काढून येतात - उत्साहाने माहिती घेतात - आई म्हणून. आधीच म्हटल्याप्रमाणे घरादाराची आई व्हायला या देशात फक्त बाईपण लागते; जन्मदात्री व्हावेच लागते असे नाही. आई कामावर गेल्यावर अगदी सात-आठ वर्षांची छोटी मुलगी किती सहजतेने घरादाराची आई होते, ते मी झोपडपट्ट्यांमधून रोज पाहते.
खरे तर प्रत्येक पुरुषातही एक "आई' असते; पण आपल्या समाजाचे दुर्दैव, की कधी पौरुष्याच्या भ्रामक कल्पनांच्या पायी, तर कधी "बाबा' संकल्पनेचा शिस्तीसाठी केलेला बागुलबुवा म्हणून पुरुषातील "आई' दाबून- मारून टाकली जाते. तिला बाहेर काढली तर कदाचित समाजातील स्त्रियांवर अत्याचार कमी होतील, नाही?
फोटो गॅलरी

प्रतिक्रिया
On 8/12/2011 1:08 PM aghao krushna said:
sarva goshtincha atishay marmik adhava ghetalay; aai ani janmadatri aai yatal gudh लोकांना ata tari samajael
On 4/28/2011 5:46 PM Anita Gurjar said:
फारच छान लेख आहे. जर प्रत्येकाने हा विचार केला तर आपल्या देशातील कितीतरी प्रश्न सुटतील. प्रत्येक स्त्री ही आईपण घेऊन येते हे अगदी खरं आहे.
On 2/3/2011 6:39 PM prasad said:
मला वाटते, प्रत्येक स्त्री आईच असते. ती आईपण घेऊनच जन्माला येते. हे "आई'पण स्वतःच्या मुलांपर्यंत मर्यादित नसते, तर सर्वच गोष्टी तिच्या मायेच्या पदराखाली असतात. "आई'पण सर्वव्यापी असते.
On 1/13/2011 5:59 PM dipti joshi said:
खूप सुंदर लेख आहे अतिशय आवडलa
On 11/11/2010 3:58 PM vishnu waghere said:
आईवर आधारित लेख वाचून मनाला समाधान वाटल आईवर कितीही लिहील तरी थोडच .माथ्याआड गेलेला सूर्य परत दिसतो पण माथ्याआड गेलेली आई पुन्हा दिसत नाही .आपले मनापासून हार्दिक अभिनंदन .
On 10/25/2010 1:36 PM patil sunita ramakant said:
aai aahe yacha abhiman vatato
On 8/8/2010 11:56 AM Priya Phadke said:
Lekh vachun khup chhan vatale.Tumacha upkramahi khup chhan ahe.Tumhala upkramasathi shubhecha.
On 31-07-2010 10:28:41 prashant pawar said:
लेख फारच छान
On 6/25/2010 8:55 AM jyoti m kale. said:
dलेख द खूपच सुंदर .एकदम भावला.वेगवेगळ्या गोष्टी मधून आईचे अस्तित्त्वा जाणून दिले.धन्यवाद.
On 6/19/2010 12:12 PM jyoti gondkar said:
Nice article!!!!!!! everyone needs to think like this!!!!!!!!!!! Keep it up Anuradha.
On 6/18/2010 10:08 AM ईशनु said:
आई , नाते , नात्यातील ओढ . हि भारताला मिळालेली देणगी आहे . कौथोबिक मूल्य कुठेही पाहायला मिळणार नाहीत जगात . ... लेख वाचून आनंद झाला.
On 6/18/2010 7:23 AM koham said:
चांगला लेख आहे. बाबांमधील आई मारून टाकण्याचा मुद्दां एकदम बरोबर आहे. पण शिव्या आईवरून असतात ही गोष्ट हा विरोधाभास नाही तर तुमच्या लेखातील मुद्याला पुष्टी देणारा आहे. प्रत्येकाला आई जवळची वाटते म्हणूनच आईवरून दिलेली शिवी अपमानास्पद वाटते.
On 6/17/2010 5:04 PM Ashwini Manish Brahme said:
प छान लेख आहे वाचताना आईच डोल्यासोमार येते आणि तिने केलेल्या त्यागाची आणि प्रेमाची तुलनाच करता येत नाही हे कळते.
On 6/16/2010 5:32 PM NAAZ said:
khup chhan lekh aahe. ya abjune kharach koni vichar karit nahi. matrubhumi, devi saraswati, devi laxmi..... khup chaan vichar aahet. apan sarvanich thoda vichar karayla hava... Thnx
On 6/15/2010 9:44 PM girish said:
अनुराधाताई - लेख अतिशय छान आहे. विचार करण्यासारखा आहे. एका वाक्यात मात्र अभावितपणे विनोद झालेला आहे. " अभ्यास करताना लक्षात आले कि आपल्या बहुतेक शिव्या ह्या आईवरून असतात..." तुम्ही शिव्यांचा अभ्यास कशाला करत होता? असो. हे मी केवळ गमतीने लिहिले आहे. लेखाबद्दल हार्दिक अभिनंदन.
On 6/14/2010 6:35 PM Sanjivanee Tophkhane said:
अनुराधाताई खूप चं लेख आहे. मातृभूमी देखील आई आहे याचे सर्वांनाच विस्मरण झालेले दिसते. मुळात केवळ जन्मदात्री म्हणजे आई नव्हे हे प्रत्येक स्त्रीनेही लक्षात घ्यायला हवे. आईपण हे खरोखरीच विश्वव्यापी आहे. एक छान लेख वाचायला मिळाला. आपले अभिनंदन.
On 6/14/2010 3:38 PM uday K Wakde said:
फारच छान प्रत्येक पुरुषामध्ये एक आई असते हे वाचून खूपच छान वाटले.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: