भुवनेश्वर - राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यापासून रोखण्यासाठी पक्षाचे लांजीगडचे आमदार शिबाजी माझी यांचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. दरम्यान, भाजपनेही त्यांचे बोनाई येथील उमेदवार भीमसेन चौधरी यांचे अपहरण झाल्याचा आरोप केला आहे.
प्रदेशाध्यक्ष व खासदार भक्तचरण दास यांनी सांगितले, की सत्ताधारी बिजू जनता दलाचे तिसरे उमेदवार वैष्णवचरण परिडा यांना फायदा होण्यासाठीच श्री. माझी यांना पळविण्यात आले आहे. 14 जूनला भुवनेश्वरकडे जात असताना तीन अनोळखी लोकांनी माझी यांचे वाहन अडवून दुसऱ्या वाहनातून त्यांना पळवून नेले. या प्रकरणी राजधानीतील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक साहू यांनी चौधरी यांच्या अपहरणाबद्दल पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. उद्या (ता. 17) होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने कॉंग्रेसचे समर्थन असलेले उद्योगपती उमेदवार तारारंजन पटनाईक यांना समर्थन जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना महत्त्व असल्याचे मानण्यात येत आहे.
Follow
Us on
Twitter