मेडिकलच्या निवासी डॉक्टरची आत्महत्या
सकाळ वृत्तसेवा
Friday, June 18, 2010 AT 01:31 AM (IST)
नागपूर - मेडिकलमधील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहात खोली क्रमांक 152 मध्ये राहणाऱ्या एका तरुण डॉक्टरने गुरुवारी (ता.17) आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. डॉ. जयदीप सोरते (वय 32) असे निवासी डॉक्टरचे नाव असून; तो रामदासपेठेतील रहिवासी होता. कान, नाक, घसा या विभागात तो कार्यरत होता.
डॉ. जयदीपच्या आत्महत्येबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आल्याने मृत्यूचे गूढ वाढले आहे. आत्महत्या झाल्यानंतर पोलिस कारवाई होताच तातडीने त्याचा मृतदेह येथील शवविच्छेदनगृहात पाठविण्यात आला.
निवासी डॉक्टरांची परीक्षा सुरू आहे. नुकतीच जयदीपची लेखी परीक्षा संपली; आणि येत्या 28 जूनपासून प्रॅक्टिकल परीक्षा होती. डॉ. जयदीप अबोल होता. गुरुवारी दुपारी त्याच्या जेवणाचा डबा घरून पाठवला; परंतु वसतिगृहात राहणाऱ्या जयदीपने तो परत घरी पाठवून दिला. यामुळे जयदीपच्या आईवडिलांनी त्याला फोन केला; परंतु कुठलाच प्रतिसाद दिला नाही. यामुळे आईवडील वसतिगृहात आले; आणि खोलीचा दरवाजा तोडताच त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. डॉ. जयदीपची बहीण मेडिकलच्या मेडिसीन विभागात अधिव्याख्याता पदावर आहे. त्याचे वडीलही डॉक्टर आहेत.
-मेडिकलच्या अधिष्ठाता पदावर 16 सप्टेंबर 2008 रोजी श्रीमती डॉ. दीप्ती डोणगावकर रुजू झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मेडिकलच्या निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहात खोली क्रमांक 67 मध्ये बधिरीकरण विभागातील डॉ. मीनल महेश कोठारी या सत्तावीस वर्षीय महिला निवासी डॉक्टरने दुसऱ्याच दिवशी आत्महत्या केली होती. तर नुकतेच 16 जून 2010 रोजी मेडिकलच्या अधिष्ठातापदाची सूत्रे डॉ. आर. एम. पोवार यांनी स्वीकारली आणि दुसऱ्याच दिवशी निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहात डॉ. जयदीप सोरते या निवासी डॉक्टरने आत्महत्या केली. माजी आणि आजी अशा दोन्ही अधिष्ठातांना मेडिकलमध्ये रुजू होताच आत्महत्या प्रकरणांची सलामी मिळाली.
मेडिकलमधील आत्महत्येच्या घटना
दोन ऑगस्ट 2008 रोजी नर्सिगच्या प्रथम वर्षाला शिकणाऱ्या कमल चवरे हिने वसतिगृहात आत्महत्या केली होती. त्यानंतर पाच महिन्यांनी भौतिकोपचार विभागातील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे प्रकरण घडले होते. यानंतर 17 सप्टेंबर 2008 रोजी डॉ. मीनल कोठारी हिने आत्महत्या केली होती. तर आज डॉ. जयदीप सोरते यांनी आत्महत्या केली. मेडिकलचे विद्यार्थी आत्महत्या का करतात, अशा गुपित चर्चांना येथे उधाण आले आहे.