आल्या पावसाच्या सरी, आनंदला शेतकरी
सकाळ वृत्तसेवा
Friday, June 18, 2010 AT 12:00 AM (IST)
धानोरा - मागील वर्षी एका पावसाने शेती गेली. कोरडा दुष्काळ पडला. शेतकरी वर्ग चिंतातुर होता. यावर्षीचा उन्हाळा नको तेवढी आग ओकत असताना, अंगाची लाहीलाही होत असताना, सर्वत्र पाणीटंचाईने उग्र रूप धारण केलेले असताना, एकदाची रविवारी रात्रीपासून पावसाने सुरवात केली. वादळी वाऱ्यासह पाऊस रात्रभर थोड्याथोड्या अंतरात पडत राहिला. सोमवारचे आगमन होताच सर्वत्र शांतता पसरली. पुन्हा एक दिवस दम धरून बुधवारी आणि गुरुवारी पावसाने आपली रिमझिम सुरू केली. संपूर्ण वातावरण आगीच्या दाहकतेमधून मुक्त झाले असून शेतकरी वर्गासह सर्वांना सुखद दिलासा मिळाला आहे.
पावसाला सुरवात झाल्याने आता शेतकरी कृषी भांडारमधून ये-जा करताना दिसत आहेत. विविध जातींच्या धान्य बियांची जाहिरात पाहून तर शेतकरी वर्गात कमालीची संभ्रमता पसरली आहे. कमी पाण्यात अधिक उत्पन्न देणारे धान, एकरी अधिक उत्पन्न देणाऱ्या विविध जातींचे धान कृषी केंद्रात उपलब्ध आहेत, तर पंचायत समिती प्रशासनाकडून शेतकरी वर्गाला मिळणारे अनुदान निश्चित न झाल्यामुळे पंचायत समितीमध्ये आलेले बियाणे धूळखात पडून आहे. अधिकारी वर्गाचा गलथानपणा शेतकऱ्यांना बाधक ठरत आहे. पंचायत समितीचे कृषी अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने कास्तकारांना नाहक चकरा माराव्या लागतात. तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून वाटप करण्यात येणारे बियाणे कृषी केंद्रांना संलग्नित केले असल्याने व धान्याचे भाव आकाशाला भिडत असल्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील बियाणे परवडणारे नाही, असे शेतकरी आपसांत बोलताना दिसतात. दुसरीकडे मागील वर्षीच्या नापिकीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसमोर "इकडे आड तिकडे विहीर' अशी स्थिती निर्माण झालेली आहे. सवलतीच्या दरात वाढ व्हावी, अशी शेतकरी वर्गाची मागणी आहे. या अनेक समस्या असल्या, तरी निसर्गाच्या पहिल्याच पावसाने मात्र शेतकरी वर्ग शेतीच्या मशागतीला लागला असून नांगरणी, वखरणीसाठी ढवळ्या-पवळ्यासह सज्ज झाला आहे.