असोदा पेट्रोलपंपावर गोळीबार करून दरोडा
सकाळ वृत्तसेवा
Sunday, June 20, 2010 AT 10:09 PM (IST)
जळगाव - असोदा (ता. जळगाव) गावानजीक असलेल्या इंडियन ऑइल कंपनीच्या पेट्रोलपंपावर आज रात्री सव्वानऊच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी हवेत गोळीबार दरोडा टाकला. व्यवस्थापकाजवळ असलेली पन्नास हजार रुपयांची बॅग घेऊन हे दरोडेखोर असोदा गावाच्या दिशेने पसार झाले.
घटनेचे वृत्त कळताच पोलिसांचा ताफा श्वानपथकासह घटनास्थळी पोचला. नशिराबाद, चोपडा, यावल, भुसावळ या गावाकडे नाकाबंदीचे आदेश देण्यात आला असून, पोलिस रात्री उशिरापर्यंत चोरट्यांचा शोध घेत होते. घटनास्थळी पोलिसांना गोळीचे कव्हर आढळून आले आहे.
जळगाव-असोदा रस्त्यावर असलेल्या अशोक नागराणी (रा. भुसावळ) यांच्या पेट्रोलपंपावरील व्यवस्थापक भूषण पेटीवाला व कर्मचारी शफी पिंजारी, संजय तडवी यांनी रात्री नऊला पेट्रोलपंप बंद केला. शटर लावत असताना अचानक दोन जण दुचाकीवर आले. दुचाकी बाजूला लावून पांढरा शर्ट परिधान केलेल्या सुमारे साडेपाच फूट उंचीच्या व्यक्तीने व्यवस्थापक पेटीवाला यांना "पेट्रोल आहे का?' अशी विचारणा केली. तद्नंतर लगेचच या व्यक्तीने "तुमच्या हातातील बॅग द्या, अन्यथा गोळी घालतो', असे सांगत हवेत गोळीबार केला व त्यांच्या जवळील पैशाची बॅग हिसकावली आणि क्षणार्धात हे दोन्ही दरोडेखोर दुचाकीवर बसून असोदा गावाच्या दिशेने पसार झाले. त्याच्या समवेत असलेला दुसरा तरुण हा 20 ते 22 वयोगटातील लाल टी शर्ट परिधान केलेला होता.
या घटनेची माहिती तालुका पोलिसांना समजताच नियंत्रण कक्षाच्या पथकासह शहरातील शहर, शनीपेठ, तालुका व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आले. अपर पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, डीवायएसपी पी. आर. पवार, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक गवारे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिनकर शेळके, प्रकाश पवार, नागेश जाधव यांच्यासह गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी परिसर पिंजून काढला. यात पोलिसांना आढळलेल्या गोळीच्या कव्हरवर 7.65 एमएम असे नमूद केले होते. ही पितळी गोळी (बुलेट) असल्याचे सूत्रांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत दरोडेखोरांचा शोध घेण्याचे काम सुरू होते.