Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

विविध पैलूंतून उलगडले "गावडेसर'
सकाळ वृत्तसेवा
Monday, June 21, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: book,   pune
पुणे - कोणतीही अपेक्षा न ठेवता ज्ञानदान करणारे... स्वतः जगलेले मूल्यभान विद्यार्थ्यांमध्ये रुजवून आदर्श नागरिक घडविणारे... आपल्या संवेदनशील वृत्तीने आळंदी ते अमेरिका हा प्रवास लेखनातून अभिव्यक्त करणारे... अमेरिकेतील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानेश्‍वरीचा तास घेणारे... असे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्र. ल. गावडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले आणि उत्कट मनोगतातून डॉ. गावडे यांच्या "भटकंती' या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन झाले.

डॉ. गावडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उत्कर्ष प्रकाशनतर्फे त्यांच्या "भटकंती' या पुस्तकाचे प्रकाशन टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते झाले. डेक्कन कॉलेजचे अध्यक्ष डॉ. गो. बं. देगलूरकर, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ-साहित्यिक डॉ. न. म. जोशी आणि प्रकाशक सु. वा. जोशी या वेळी उपस्थित होते.

प्रा. मिरासदार म्हणाले, ""शाळकरी वयात गावडे अभ्यासू विद्यार्थी. तर मी नुसताच विद्यार्थी. त्यांचे मार्गदर्शन मला होत असे. तेव्हापासूनची आमची मैत्री. शिक्षण क्षेत्रात योगायोगाने एकत्र आलो. त्यापूर्वी दोघेही दैनिक "भारत'मध्ये काम करीत होतो. आम्ही दोघेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहोत.'' मी त्या गावचा असूनही पंढरपूरचे मोठेपण आणि भक्तिभाव हा मला गावडेंच्या लेखनाचे वाचन करूनच जाणवला, असेही ते म्हणाले.

डॉ. जोशी म्हणाले, ""आळंदी ते अमेरिका असा गावडे यांच्या लेखनाचा पैस असून त्यातून व्यक्तिदर्शन, स्थलदर्शन, समाजदर्शन आणि आत्मदर्शन अशी चतुःसूत्री जाणवते. हे लेखन म्हणजे शिक्षण, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील भटकंतीचा समाजाचा सहा दशकांचा दस्तावेज आहे.''

डॉ. देगलूरकर म्हणाले, ""सोपी भाषा हे वैशिष्ट्य असलेल्या या पुस्तकातून भावुक आणि उत्कट अशा गावडेसरांच्या मनाचे पापुद्रे उलगडले आहेत.''

डॉ. टिळक म्हणाले, ""सध्या शिक्षण क्षेत्र भरकटत असताना गावडेसरांच्या मार्गदर्शनामुळे आपण चूक की बरोबर याची योग्य दिशा मिळते.''

डॉ. गावडे म्हणाले, ""कोणतीही अपेक्षा न ठेवता ज्ञानदान केले, तर विद्यार्थी भरभरून देतात याची प्रचिती मला पदोपदी येत आहे. विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या या प्रतिसादामुळे माझी काम करण्याची ऊर्जा वाढते. उंच पर्वतांबरोबरच मोठ्या उंचीची माणसे पाहण्याचे भाग्य मला लाभले. तेच मी या लेखनातून मांडले आहे.''

या वेळी डॉ. वि. भा. देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. जोशी यांनी स्वागत केले.



आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: