जातीच्या वैधतेसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात!
-
Monday, June 21, 2010 AT 11:45 PM (IST)
राजेश मोरे - सकाळ वृत्तसेवा
ठाणे - ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली महापालिका आणि सुमारे 150 ग्रामपंचायतींच्या निवडणुका यंदा होणार आहेत. शासनाच्या नियमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करतानाच जातपडताळणीची वैधता सादर करणे आवश्यक आहे; परंतु अद्याप अनेक संभाव्य उमेदवारांनी आपल्या जातपडताळणीसाठी पुढाकार न घेतल्याने त्यांची ऐनवेळी धावपळ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काही संभाव्य उमेदवारांनी मात्र वैधतेची मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये निवडणुकीच्या अर्जांची पडताळणी होतानाच जातीचे दाखले सादर केले जात होते. काही वेळा तर जातीच्या दाखल्यांची पावतीही सादर केली जात होती; परंतु त्यानंतर विविध कारणांमुळे जातपडताळणीच्या फेऱ्यात अडकलेल्या अनेकांना निवडणुका जिंकल्यावरही घरी बसण्याची वेळ आली. याचा फटका केवळ उमेदवार अथवा पक्षालाच नाही, तर संबंधित प्रभागातील विकासकामांना बसत होता. अखेर यावर उपाय म्हणून जातीच्या वैधतेचे प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. निवडणुकीचा अर्ज दाखल करताना वैधता प्रमाणपत्र दाखल न केल्यास अर्ज तत्काळ बाद होणार आहे. अशा वेळी ऐनवेळी उमेदवारांची धावपळ होऊ नये, यासाठी ठाण्यातील निवडणूक कार्यालयाच्या वतीने लवकरच जाहिरातीच्या माध्यमातून उमेदवारांना आवाहन केले जाणार असल्याचे कळते.
जाहिरातीची मदत
कल्याण-डोंबिवली महापालिकेसह मुरबाड तालुक्यातील 45, कल्याण तालुक्यातील 22, वसईतील दोन, अंबरनाथच्या 28 आणि भिवंडीतील 47 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम डिसेंबरच्या आधी पूर्ण केला जाणार आहे. या परिसरातील राखीव जागांवरील संभाव्य उमेदवारांनी आपली जात वैधता तयार ठेवणे अपेक्षित मानले जात आहे; पण या परिसरातील संभाव्य उमेदवारांकडून पाहिजे त्या वेगाने वैधता तपासणीसाठी पुढाकार घेतल्याचे आढळत नसल्याने निवडणूक विभागाच्या वतीने जाहिरातीच्या माध्यमातून जात वैधतेचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.