
मुंबई - लहान मुलींचे अपहरण, बलात्कार आणि निर्घृण खुनाच्या घटनांनी कुर्ला- नेहरूनगर परिसरात असलेला असंतोष लक्षात घेऊन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी काल (ता.20) रात्री उशिरा या परिसराला भेट दिली. दरम्यान, तिन्ही घटनांतील आरोपी एकच असल्याची शक्यता वर्तवित पोलिसांची सत्तावीस पथके आरोपीच्या तपासासाठी तयार करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त संजीव दयाळ यांनी पत्रकारांना दिली.
कुर्ला - नेहरूनगर येथून 6 जून रोजी बेपत्ता झालेल्या नुसरत शेख या आठ वर्षांच्या लहान मुलीचा मृतदेह वत्सलाबाई नाईकनगर येथील एका बंद घरात सापडला. तो छिन्न-विछिन्न अवस्थेत होता. राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचेही स्पष्ट झाले. या परिसरात गेल्या पाच महिन्यात लहान मुलीचे अपहरण, बलात्कार व हत्येची ही तिसरी घटना असल्याने येथील नागरिकांत पोलिसांविरोधात संतापाचे वातावरण आहे. या तिन्ही घटनांमागे विकृत मनोवृत्तीचा एकच आरोपी असल्याची शक्यता असल्याने पोलिसांनी कुर्ला- नेहरूनगर परिसरात संशयित आरोपीची शोधमोहीम सुरू केली आहे. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा, विशेष शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके संशयित आरोपीचे रेखाचित्र घेऊन पायी फिरत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सुमारे दीड हजार तरुणांची चौकशी झाली आहे.
परिसरात नागरिकांत पोलिसांविरोधात वाढत असलेला असंतोष लक्षात घेता गृहमंत्र्यांनी काल रात्री वत्सलाबाई नाईकनगर येथे जाऊन पाहणी केली. तसेच मृत मुलीच्या कुटुंबीयांचेही सांत्वन केले. गृहराज्यमंत्री रमेश बागवे, पोलिस आयुक्त संजीव दयाळ, कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त रजनीश सेठ यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज या परिसराला भेट देऊन सुरू असलेल्या तपासाचा आढावा घेतला. या वेळी पत्रकारांशी बोलताना श्री. बागवे यांनी ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना असल्याचे म्हटले. पोलिस या प्रकरणातील आरोपीचा रात्रंदिवस शोध घेत आहेत. पालकांनी त्यांच्या लहान मुलांची काळजी घेऊन पोलिस व तपास यंत्रणांना मदत करावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. या घटनेमागील गुन्हेगार याच परिसरात राहणारा असल्याने तो सापडण्यास उशीर होत आहे; मात्र लवकरच तो पोलिसांच्या ताब्यात असेल, असेही बागवे या वेळी म्हणाले.