अहलावत यांना अटकपूर्व जामीन
-
Wednesday, June 23, 2010 AT 12:00 AM (IST)
चंडीगड - महिला वकिलाच्या विनयभंग प्रकरणी गोत्यात आलेले हरियानाचे माजी पोलिस महासंचालक एम. एस. अहलावत यांना आज उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. अहलावत यांनी आठ वर्षांपूर्वी विनयभंग केल्याचा आरोप एका महिला वकिलाने केला आहे. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर स्थानिक न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अहलावत फरारी झाले होते. सुटीच्या काळातील न्यायाधीश अलोक सिंग यांनी जामीन मंजूर करतानाच पोलिसांना तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. अहलावत हे विमाननगरचे पोलिस अधीक्षक असताना सदर महिला हुंड्यासाठी होत असलेल्या त्रासामुळे पतीच्या विरोधात तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेली असता अहलावत यांनी विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.